लोकप्रिय रिअलिटी शो बिग बॉसचं १५ वं पर्व नुकतंच संपलं. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या शोची विजेती ठरली. तर प्रतीक सहजपाल फर्स्ट रनरअप. प्रतीकला विजेतेपद मिळालं नसलं तरीही त्यानं प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली. अनेकांनी तर सोशल मीडियावर प्रतीकच आमच्यासाठी बिग बॉसचा विजेता आहे अशा आशयाच्या पोस्ट लिहिल्या होत्या. आता फर्स्ट रनरअप ठरलेल्या प्रतीक सहजपाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सलमान खाननं त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
प्रतीक सहजपालनं शोमधून बाहेर पडल्यानंतर सलमान खाननं दिलेल्या सल्ल्याबाबत खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला, ‘सलमान खाननं मला मेहनतीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. तो मला म्हणाला, ‘जर तुम्हाला काही हवं असेल तर ती मागण्यासाठी कोणताही संकोच करू नये. वेळ पडल्यास भीक मागावी लागली तरीही चालेल. मला जर एखादी गोष्ट हवी असेल मी त्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो.’
सलमानचा विनम्र स्वभाव आणि कामाप्रती त्याची ओढ या दोन्ही गोष्टी मला प्रेरणा देतात असंही या मुलाखतीत प्रतीकनं सांगितलं. सलमान खाननं प्रतीकला स्वतःचं एक टी-शर्ट भेट म्हणून दिलं होतं. ज्यासाठी प्रतीकनं एक पोस्ट लिहून सलमान खानचे आभार मानले होते. त्यानं लिहिलं, ‘सर्वांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी सर्वांचे आभार. या टीशर्टसाठी थँक यू भाईजान. मी आशा करतो की, तुम्हाला माझा अभिमान वाटत असेल. स्वप्न पूर्ण होतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला हवा.’