बिग बॉस हा टीव्ही शो जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो वादग्रस्तही ठरताना दिसतो. पण या शोच्या माध्यमातून अनेक सदस्यांची आतापर्यंत चांगली मैत्री झालेली पाहायला मिळाली आहे. एवढंच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांच्या प्रेमाची सुरुवात बिग बॉसच्या घरापासून झाली होती. बिग बॉस १५ मध्ये मागच्या काही दिवसांत अशीच एक जोडी चर्चेत होती ती म्हणजे रश्मी देसाई आणि उमर रियाज. या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. पण आता यावर उमर रियाजनं मौन सोडलं आहे.
बिग बॉस १५ ची ट्रॉफी कोणीही जिंकू दे. पण उमर रियाजनं मात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उमरला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. पण यासोबतच त्याच्या सिक्रेट रिलेशनशिपची आणि रश्मी देसाईसोबतच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. उमर रियाज ‘स्कूल लव्ह ४’ विनर मनप्रीत कौरला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. या सगळ्यावर आता उमरनं प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उमर रियाजनं या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मनप्रीतसोबत सिक्रेट रिलेशनशिप असल्याच्या चर्चांबद्दल उमर म्हणाला, ‘मनप्रीत माझी एक चांगली मैत्रीण आहे. जर तुम्ही कोणाचे मित्र असाल तर तुम्ही त्यांना सोशल मीडियावर फॉलो करता. त्यांचे फोटो लाइक करता. पण त्यामुळे तुमचं त्या व्यक्तीसोबत अशाप्रकारचं कोणतं नातं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मनप्रीत माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि त्यापलिकडे आमच्यात कोणतंही नातं नाही.’
याशिवाय बिग बॉसच्या घरात उमर आणि रश्मी यांच्यातील जवळीक पाहता घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं त्यांच्या नात्याला नाव देतील असा अंदाज होता. पण उमर रियाजनं या सर्व चर्चांवरही भाष्य करत रश्मि केवळ आपली चांगली मैत्रीण असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘मला सध्या कोणत्याही प्रकारच्या नात्यात अडकून राहायचं नाही. मी माझं पूर्ण लक्ष कामावर केंद्रीत केलं आहे. माझ्या डोक्यात सध्या बरेच विचार आहेत. पण कोणत्याही नात्यासाठी सध्या मला वेळ नाही.’ दरम्यान यावर रश्मिकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.