बिग बॉस १६ आणि खतरों के खिलाडी फेम अभिनेत्री अर्चना गौतमला मारहाण झाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. अर्चना गौतमला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ती दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात पोहचली तेव्हा तिला आणि तिच्या वडिलांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली असा आरोप आता अभिनेत्रीने केला आहे. तसंच हे सगळं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असंही या अभिनेत्रीने सांगितलं आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अर्चना गौतम ही तिच्या वडिलांसह दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी पोहचली होती. त्यावेळी तिने वडिलांना घेऊन पक्षाच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला जाऊ दिलं गेलं नाही. तिथे उपस्थित महिलांनी आपल्याला मारहाण केली असं अर्चना गौतमने म्हटलं आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण आलो होतो तरीही आपल्याबाबत हा प्रकार घडला अशी माहिती अर्चनाने माध्यमांना दिली आहे.
काय म्हटलं आहे अर्चना गौतमने?
मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जात होते. मात्र मला अडवण्यात आलं. त्यानंतर मला धक्काबुक्की करण्यात आली. तसंच शिवीगाळ करुन कार्यालयाबाहेर पिटाळून लावण्यात आलं. माझ्या वडिलांनी मला सावरलं आणि कारमध्ये बसवून निघून गेले. मात्र आता मी शांत बसणार नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रीशी काँग्रेस पक्ष असा वागत असेल तर इतरांचं काय? मी गप्प बसणार नाही. यापुढची लढाई सुरुच ठेवणार. माझ्याबाबत जो प्रकार झाला तो धक्कादायक होता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं वर्तन चुकीचं होतं असंही अर्चना गौतमने म्हटलं आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अर्चना गौतमचे वडील आज या प्रकरणात मेरठमध्ये पोलीस तक्रार करणार आहेत. तसंच अर्चना गौतम ही या प्रकरणात आज पत्रकार परिषद घेणार आहे. अर्चना या पत्रकार परिषदेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.