‘बिग बॉस’च्या ‘ग्रॅण्ड फिनाले’ला केवळ दोनच आठवडे शिल्लक असताना, घरातल्या स्पर्धकांमधली चुरस वाढली आहे. घरातील आठ स्पर्धक अंतिम विजेतेपदासाठी एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे करताहेत. असे करत असताना त्यांचे खरे रंग प्रेक्षकांसमोर येत आहेत. या आठवड्यात, लक्झरी बजेटच्या टास्कबरोबरच, ‘टिकेट टू फिनाले’ टास्कद्वारे विजेत्याला शोच्या ‘ग्रॅण्ड फिनाले’मध्ये ‘डायरेक्ट एन्ट्री’ मिळविण्याची संधी ‘बिग बॉस’तर्फे स्पर्धकांना देण्यात आली आहे.
यावेळी ‘बिग बॉस’तर्फे टीम ‘ए’ आणि टीम ‘बी’ अशा दोन टीम करण्यात आल्या आहेत. टीम ‘ए’मध्ये अरमान, तनिषा, अॅण्डी आणि संग्रामचा समावेश आहे, तर टीम ‘बी’ कुशाल, गौहर, कामया आणि एजाझ यांची आहे. टास्कच्या शेवटी हारलेल्या टीममधील चांगली कामगिरी न केलेल्या स्पर्धकाला योग्य खुलासा करून स्पर्धेतून बाहेर काढण्याचा अधिकार जिंकलेल्या टीमला देण्यात आला आहे. ‘समय से पहरा’ या पहिल्या टास्कमध्ये स्पर्धकांना प्रत्येक मिनिट उच्चारून घड्याळाच्या वेळेवर लक्ष ठेवत प्रत्येक तासाच्या शेवटी योग्य वेळ घोषित करण्याची कामगिरी देण्यात आली आहे. ‘शैतान और फरिश्ता’ या दुरऱ्या टास्कमध्ये आपल्या मेडलचे रक्षण करत, विरूद्ध टीमचे मेडल चोरण्याची कामगिरी सोपविण्यात आली आहे. अरमानची टीम हे दोन्ही टास्क जिंकून, स्पर्धेतून बाहेर होण्यासाठी घरातील दोन स्पर्धकांची नावे जाहीर करते.
‘कभी हा कभी ना’ या शेवटच्या टास्कमध्ये एका टीमने विरूद्ध टीमला काही आज्ञा द्यायच्या आहेत, ज्याची पूर्तता त्या टीमने करायची आहे. आज्ञेच्या पूर्ततेवर प्रत्येक टीमला मार्क देण्यात येतात.
पहिले दोन टास्क जिंकण्यास असमर्थ ठरलेली टीम ‘बी’ हा शेवटचा टास्क जिंकण्यात यशस्वी होते आणि विरुद्ध टीममधील एकाला बाहेरचा रस्ता दाखवते. डायरेक्ट ‘ग्रॅण्ड फिनाले’चे तिकीट कोणाला मिळते, हे अजून गुलदस्त्यातच आहे.