‘बिग बॉस’च्या घरात रोज काहीना काही नवे घडत असते. या घरात सध्या वादांचे आणि वाईट विचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना रात्रभर हवन करण्याचे कार्य दिले आहे. जेणेकरून, ‘बिग बॉस’च्या घरात शांतता नांदू शकेल. यावेळी, जनार्दन बाबा या ज्योतिषाची ओळख ‘बिग बॉस’ने स्पर्धकांशी करून दिली. घरातील सर्व स्पर्धकांनी जनार्दन बाबांचा आशिर्वाद घेतला. तसेच, जनार्दन बाबा स्पर्धकांसमवेत काही वेळ घालवणार असून, त्यांचे चेहरे पाहून भविष्यही सांगणार आहे.
भविष्य जाणून घेण्यासाठी यावेळी संग्रामने पहिला नंबर लावला. संग्राम क्रीडा जगतात चांगली कामगिरी करेल आणि भावी आयुष्यात तो एक उद्योजक म्हणूनही नावारुपास येईल, असे बाबांनी सांगितले. ‘मिकी वायरस’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी एली ही वयाच्या ३४व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारुपास येईल. तसेच, तिचे लग्न एका उद्योजकाशी होईल, असे एलीचा चेहरा पाहून जनार्दन बाबा म्हणाले.
‘बिग बॉस’मध्ये नेहमीच वादाच्या भोव-यात असलेल्या कुशाल टंडनला बाबांनी बोलावून त्याचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले. नंतर प्रत्युषा, कामया, अॅण्डी यांचे चेहरे पाहून त्यांच्या भविष्यातील काही चांगल्या गोष्टींची माहिती बाबांनी दिली. सर्वांचे भविष्य सांगून झाल्यावर ‘बिग बॉस’ने जनार्दन बाबांना कन्फेशन रुममध्ये बोलावून पाच अंतिम स्पर्धकांची नावे सांगण्यास सांगितले. त्यानंतर जनार्दन बाबांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला. आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे भविष्य खरे ठरते का, हे पाहणे औसुख्याचे असेल.