‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १२ व्या पर्वाची मोठ्या दणक्यात सरुवात झाली. या शोमध्ये क्रिकेटपटू श्रीसंतच्या एण्ट्रीमुळे या शोला वेगळं वळण मिळालं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर श्रीसंतच्या नावाची चांगली चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. बिग बॉसनंतर श्रीसंतकडे आणखी एका रिअॅलिटी शोची ऑफर आली असून तो लवकरच या शोमध्ये झळकण्याची शक्यता आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘नच बलिए’कडून श्रीसंतला ऑफर आली आहे. सध्या श्रीसंत या ऑफरवर विचार करत असून अद्याप तरी त्याने होकार कळविलेला नाही. मात्र लवकरच तो या शोमध्ये झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘नच बलिए’च्या निर्मात्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला असून अद्याप तरी मी माझा होकार कळविला नाही. सध्या मी बीसीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे ‘नच बलिए’ने ठेवलेल्या प्रस्तावावर होकार कळविला नाही, असं श्रीसंतने आयएएनएसशी बोलताना सांगितलं.
पुढे तो म्हणतो, “बीसीसीआयचा निर्णय कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे मी ‘नच बलिए’साठी माझा होकार कळवत नाहीये. कारण ‘नच बलिए’ हा शो साधारण ३-४ महिने सुरु राहिलं. त्यामुळे सध्या माझी द्विधा मनस्थिती झाली आहे. दरम्यान, बिग बॉसचं १२ वं पर्व यंदा चांगलंच गाजलं होतं. हे पर्वा ‘विचित्र जोडी’ या संकल्पनेवर आधारित होतं. विशेष म्हणजे श्रीसंतव्यतिरिक्त नेहा पेंडसे, अनुप जलोटा, सबा खान, दीपिका कक्कर,करणवीर बोहरा हे स्पर्धकही चर्चेचा विषय ठरले होते.