अभिनेता आविष्कार दारव्हेकर हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वामुळे तो खरा प्रसिद्धीझोतात आला होता. बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेला आविष्कार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एकीकडे पुन्हा एकदा लग्न केलेल्या चर्चेत आलेल्या आविष्कारावर त्याची कथित पत्नी असा दावा करणाऱ्या एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. आविष्कारने केलेले हे तिसरे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा त्याची दुसरी पत्नी स्मिता सावंत हिने केला आहे. तसेच माझा या लग्नाला विरोध आहे असेही तिने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मिता सावंत हिने नुकतंच फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ती आविष्कार दारव्हेकर याची दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे. त्यात तिने आविष्कारच्या तिसऱ्या लग्नावरुन विविध गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे तिने त्याच्यासोबतचा लग्नातील एक फोटोही शेअर केला आहे. यात तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. त्यासोबत तिने एक पोस्टही शेअर केली आहे.
‘बिग बॉस ३’ फेम अभिनेता अविष्कार दार्वेकर पुन्हा अडकला विवाहबंधनात, दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला….

स्मिता सावंत यांची प्रतिक्रिया

“नमस्कार!!!!! मी अवनी (स्मिता)….आविष्कारची बायको…आम्हाला ५ वर्षांचा एक मुलगा आहे… आविष्कारने मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे… आमचा घटस्फोट झालेला नसतानाही त्याने या मुलीशी लग्न केलं आहे…ते ही मला कळू न देता…

त्या मुलीच्या घरचे मला ओळखत होते, मी त्यांच्या घरी देखील जाऊन आले होते… तरी देखील त्या मुलीच्या आणि याच्या घरच्यांनी मला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे सगळे दागिने विकले… माझ्या नावावर खूप कर्ज करुन ठेवलेत… माझे, माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले…. आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्याने मला सांगितलं की कोर्टात जाऊन माग…त्याच्या घरी गेले तेव्हा मला हातापाया पडायला लावलं…तरच पैसे देईन म्हणाला… त्या मुलीला विचारलं असता ती मला उलट बोलायला लागली… मारायला धावून आले अंगावर….”, असे आरोप स्मिता सावंत हिने केले आहेत.

दरम्यान आविष्कार दार्वेकर याने यापूर्वी एक लग्न केले होते. अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यासोबत तो विवाहबंधनात अडकला होता. त्यावेळी स्नेहा ही १९ वर्षांची होती. पण त्यावेळी त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर आविष्कारने आणखी एक लग्न केल्याचे बोललं जात आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने याबाबतचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे आता आविष्कार हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्याचे बोललं जात आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही फोटो शेअर केले होते. या फोटोत आविष्कार हा त्याच्या पत्नीसोबत पाहायला मिळत होते. ते दोघेही बर्फाच्छादित प्रदेशात फिरायला गेल्याचे पाहायला मिळत आहेत. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आविष्कारने शेअर केलेल्या या फोटोंमुळे त्याने पुन्हा एकदा लग्न केल्याचे बोललं जात होतं. आविष्कारच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय? ती कोण आहे? काय करते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame actor avishkar darvekar wife smita sawant facebook post nrp