‘इंडियन आयडल’च्या पहिल्याच पर्वातून घरोघरी पोहोचलेला गुणी गायक राहुल वैद्य हा सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय आहे. राहुल जरी चित्रपटासाठी पार्श्वगायन करत नसला तरी त्याचे खासगी कार्यक्रम, कॉन्सर्ट, हे सुरूच असतात शिवाय मध्यंतरी बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्येसुद्धा स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती.
बिग बॉसमध्ये राहुल आणि रुबिना दिलाईक यांच्यात चांगलंच वैमनस्य निर्माण झालं होतं. तेव्हापासून या दोघांचे चाहतेदेखील त्यांच्या आवडत्या स्टारची बाजू घेत एकमेकांवर चिखलफेक करत असतात. अशाच एका रुबिनाच्या चाहत्याने राहुलबद्दल नुकतंच अतिशय चुकीच्या भाषेत ट्वीट केलं. या ट्वीटला राहुलने दिलेल्या उत्तराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
आणखी वाचा : ‘धाकड’च्या अपयशाबद्दल कंगना रणौतने सोडले मौन; म्हणाली, “माझं पात्र हे गरजेपेक्षा जास्त…”
एका यूझरने राहुल वैद्यला टॅग करत, ट्वीटमध्ये म्हंटलं, “हा बिनकामाचा निर्लज्ज आणि पळपुटा असा फ्लॉप वेडिंग सिंगर (लग्नात गाणारा गायक) आहे.” या ट्वीटला राहूलने अगदी विनोदी शैलीत उत्तर दिलं आहे. राहुल म्हणाला, “तुमचं लग्न झालंय का? मी तुमच्या लग्नातसुद्धा गायला येऊ शकतो.. पण थांबा माझं मानधन तुम्हाला परवडायचं नाही, त्यामुळे बहुतेक आपली भेट पुढल्या जन्मातच होईल.”
राहुलच्या या उत्तरावर सगळेच खुश आहेत. त्याने त्या ट्विटर यूझरचं तोंड कोणताही अपशब्द न वापरता बंद केल्याने त्याचे चाहते त्यांचं कौतुक करत आहे. इतकंच नाही तर राहूची बायको म्हणजेच दिशा परमारने अशा लोकांना उत्तर देण्यात आपला वेळ घालवू नकोस असं ट्वीट करत त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. राहूलचा नुकताचा ‘नॉटी बालम’ हा म्युझिक व्हिडिओ चांगलाच गाजला शिवाय त्याने ‘खतरों के खिलाडी’च्या १२ व्या पर्वातही सहभाग घेतला होता.