छोट्या पडद्यावरील सर्वांचा लाडका आणि वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. हा शो कायमच लोकप्रिय असतो. मराठी बिग बॉस सुरु झाल्यापासून हा शो कायमच सुपरहिट ठरला आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय ठरतो. ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या घरात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याबद्दल विविध चर्चा समोर येत आहेत. मात्र नुकतंच अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांना या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील याबद्दल भाष्य केले आहे.
मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिले जात आहे. विविध क्षेत्रातील १६ कलाकार घेऊन बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सज्ज झाले आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला हा कार्यक्रम सज्ज झाला आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ALL IS WELL अशी असणार आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
आणखी वाचा : अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसह झळकणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, चर्चांना उधाण
नुकतंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी महेश मांजरेकरांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मला सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडे या कलाकारांना बघायला आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील. तसेच ते हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील.”
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर
दरम्यान बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे नाव समोर येत होते. तो हा शो होस्ट करणार असल्याचेही बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वीच यंदा बिग बॉसचे पर्व कोण होस्ट करणार याबाबतचा खुलासा झाला. महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.