छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये होणारे राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरांऐवजी दुसरा कलाकार करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच याबद्दल महेश मांजरेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बिग बॉस मराठीच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व होस्ट करण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचे नाव समोर येत आहे. नुकतंच या सर्व चर्चांवर महेश मांजरेकरांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
“माझं बिग बॉस या कार्यक्रमासोबतच कॉन्ट्रक्ट ३ वर्षांचं होतं. मी गेले तीन वर्ष नित्यनियमाने तो शो केला. जर मला त्यात पुन्हा घेतलं तर मला तो करायला नक्की आवडेल. पण माझं कॉन्ट्रक्ट संपलेले आहे. तसेच चॅनलही मलाच घ्यायला हवं यासाठी बांधिल नाही. पण जर मला तो शो होस्ट करण्यास सांगितला तर मी तेवढ्याच मेहनतीने ते करेन आणि नाही केला तरी तेवढ्याच उत्साहाने तो बघेन. तसेच हा शो नवीन जो कोणी होस्ट करत असेल त्याचे कौतुकही करेन”, असे महेश मांजरेकर म्हणाले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होस्ट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सध्या विविध भूमिका साकारताना दिसत आहे. तो मराठीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटातही त्याने महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करु शकतो अशी चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप त्याने यावर कोणताही खुलासा केलेला नाही.
‘बिग बॉस मराठी’ ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर पाहिलात का?
तर दुसरीकडे महेश मांजरेकर हे दरवर्षी या कार्यक्रमाबद्दल विविध पोस्ट करत असतात. मात्र यंदा त्यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे यंदा ते हा कार्यक्रम होस्ट करणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.