छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये होणारे राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या बिग बॉसच्या पर्वात प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच हार्दिकने याबाबतचे संकेत दिले आहे.
बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी हा यात सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. हार्दिक जोशीला बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी संपर्कही साधण्यात आला होता. पण त्याने त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. पण नुकतंच एका कार्यक्रमात हार्दिकने हजेरी लावली. यावेळी हार्दिकला बिग बॉसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने जाहीरपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, माझ्या सहभागाबद्दल लोकांनी शेवटपर्यंत अंदाज लावावा, असे मला वाटतं. कारण ते फार मजेशीर आहे. मला याबद्दल घाईघाईत काहीही उघड करायचे नाही. सर्वांना त्यांचा त्यांचा अंदाज लावू द्या. माझे नाव गेल्या काही महिन्यांपासून यामुळे चर्चेत आहे. पण मला सस्पेन्स कायम ठेवायचा आहे. यात एक वेगळंच थ्रील आहे.
सध्या मी आणि माझी होणारी पत्नी अक्षया देवधर लग्नाच्या तयारीत गुंतलो आहोत. सध्या आम्ही लग्नाची तयारी करत आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या अनेक मित्र-मैत्रिणींकडे केळवणासाठी गेलो होतो. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. लवकरच आम्ही दोघे विवाहबंधनात अडकणार आहोत, असे हार्दिकने सांगितले.
दरम्यान बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यानंतर बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे नाव समोर येत होते. तो हा शो होस्ट करणार असल्याचेही बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वीच यंदा बिग बॉसचे पर्व कोण होस्ट करणार याबाबतचा खुलासा झाला. महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.