‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi) यंदाचं पाचवं पर्व प्रचंड गाजलं. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यही चर्चेत आले. अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर यांच्याप्रमाणेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार (Dhananjay Powar) यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडणं पाहायला मिळाली. पण धनंजय यांच्या विनोदी स्वभावामुळे घरातील वातारण कायमच हसतं-खेळतं राहीलं.
धनंजय हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. तसंच काही हटके फोटोही ते शेअर करत असतात. अशातच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वत:चे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोखाली त्यांनी अनोखं कॅप्शनही लिहिलं आहे.
धनंजय यांच्या या पोस्टमुळे त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या फोटोबरोबर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “कोणी कधी समजून घेतलं नाही. प्रत्येक वेळी मला माझी बाजू समजावूनच सांगायला लागली. की असं झालं आणि तसं झालं. सगळं काही अस्तित्वावर येऊन थांबतं. पण नसेन तेव्हा असं नका करू”. धनंजय यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धनंजयच्या या पोस्टला त्याच्या चाहते मंडळींनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “वा दादा”, “एकदम भारी”, “एकच वादा डीपी दादा” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी या पोस्टवर व्यक्त केल्या आहेत. कोल्हापुरचा ढाण्या वाघ म्हणून ओळखला जाणाऱ्या धनंजय यांनी विनोदी शैलीने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकल्यापासून त्यांच्या प्रसिद्धीझोतात खूपच वाढ झाली.
दरम्यान, धनंजय पोवार आपल्या कॉमेडी व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. त्यांची अंकिताबरोबरची मजामस्ती अनेकांनी एन्जॉय केली. नुकतीच त्यांनी तिच्या लग्नात खास हजेरी लावली होती. याचे काही खास क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.