मुंबई आणि वाहतूक कोंडी हे जणू एक समीकरणच बनलं आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामं व मेट्रो स्टेशनची उभारणी यांसारख्या अनेक कारणांनी मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सामान्य मुंबईकरांसह अनेक मराठी कलाकारही या समस्येला तोंड देत आहेत. त्याबद्दल अनेक कलाकार व्यक्तही होत असतात. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’ (Bigg Boss Marathi 5) फेम जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती स्वत:चे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. त्याचबरोबर अनेक सामाजिक किंवा राजकीय विषयांवर ती वक्तव्य करताना दिसते. अशातच आता तिनं सोशल मीडियाद्वारे मुंबईतील वाहतूक कोंडीबद्दल राग आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री तब्बल दोन तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती आणि या परिस्थितीचा व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमधून तिनं संताप व्यक्त करीत असं म्हटलं आहे, “मुंबईच्या ट्रॅफिकचं मला काही कळतच नाही. आमच्या बाजूनं हवालदारानं चुकीच्या दिशेनं गाड्या सोडल्या आहेत आणि त्यांची तिकडची लेन जर बघितली, तर ती पूर्ण रिकामी आहे. तिकडे काही ट्रॅफिकच नाहीये. सगळ्या गाड्या अगदी सहज जात आहेत. पण तरीही हवालदारानं त्या लेनच्या गाड्या आमच्या लेनमधून सोडल्या आहेत. गेले दोन तास मी या ट्रॅफिकमध्ये आहे.”

जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम स्टोरी स्क्रीनशॉट

यापुढे जान्हवीने असं म्हटलं आहे, “वेस्टर्न एक्स्प्रेसवरील गोरेगावचा हा ब्रिज आहे. म्हणजे काय करावं ट्रॅफिकचं. विरुद्ध दिशेची लेन अगदीच रिकामी असूनसुद्धा या आमच्या लेनवरून गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही इथे मूर्खासारखे अडकलो आहोत. गेले दोन तास मी या ब्रिजवर आहे. म्हणजे मला याचं रहस्यच कळत नाहीय. यात कुठलं लॉजिक आहे आणि हे नक्की कुठल्या डोक्यानं ट्रॅफिकचं व्यवस्थापन करीत आहेत. मूर्ख लोक.”

जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम स्टोरी स्क्रीनशॉट

जान्हवीने शेअर केलेला हा व्हिडीओ काल (मंगळवार) रात्रीचा आहे. मुंबईतील गोरेगावमधील वाहतूक कोंडीबद्दल, तसेच या वाहतूक कोंडीच्या व्यवस्थापनाबद्दल तिनं संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

‘अबोली’ मालिकेआधी तिनं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. या शोमधील तिच्या खेळाचं कौतुक झालं होतं. मात्र, काही वक्तव्यांमुळे तिला प्रेक्षकांच्या टीकेचाही सामना करावा लागला होता. पंढरीनाथ कांबळे यांच्या कामाबद्दल केलेल्या व्यक्तव्यामुळे सोशल मीडियावर ती टीकेची धनी बनली होती.