Bigg Boss Marathi Grand Finale : अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची पहिली विजेती ठरली आहे. लोणावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत मेघाने पुष्कर जोगवर मात केली. जवळपास गेल्या शंभर दिवसांपासून चाललेला हा प्रवास अखेर संपला आणि या प्रवासात सर्वात जास्त ज्या व्यक्तीची चर्चा झाली, तीच व्यक्ती विजेती म्हणून सर्वांसमोर आली. १८ लाख ६० हजार रुपये तिला बक्षिसाची रक्कम म्हणून मिळाली आहे.

मराठी बिग बॉसच्या घरात असो किंवा बाहेर सतत मेघाची चर्चा झाली. घरात असा क्वचितच कुणी स्पर्धक असेल, ज्याच्यासोबत तिचं भांडण झालं नाही. प्रत्येकावर हक्क गाजवणं, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं या स्वभावामुळं ती सर्वांच्या निशाण्यावर असायची. असं असलं तरी मेघा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसली. बिग बॉस मराठीच्या घरातील मेघाचं एकंदर वागणं आणि तिचा वावर यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली.

१५ एप्रिल रोजी बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाला. ज्यामध्ये जवळपास १२ सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हा शो कायम चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावर जवळपास आठवड्याभरापासून जोरदार चर्चा रंगली.

Story img Loader