अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक व ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील त्यांचा बदललेला लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल! ६१ वर्षीय महेश मांजरेकर यांनी आठ महिन्यांत वजन कमी करून स्वत:चा लूक पूर्णपणे बदलला आहे. आताचा नवीन लूक पाहून ते ६१ वर्षांचे आहेत का असाच प्रश्न तुम्हाला पडेल.
वजन कमी करण्यापूर्वीचा व नंतरचा असे दोन फोटो महेश मांजरेकरांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘इच्छा तेथे मार्ग…आठ महिन्यांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. जर मी हे साध्य करू शकलो तर हे कोणीही सहज करू शकतो.’ त्यांच्या या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत आहे. वजन कमी करण्यासाठी काय केलं असा प्रश्न अनेकजण त्यांना विचारत आहेत.
https://www.instagram.com/p/B-CzFKYlc6T/
आणखी वाचा : ‘या’ तीन अभिनेत्रींसोबत इमरान हाश्मी कधीही देणार नाही किसिंग सीन, कारण…
नेटकऱ्यांसोबतच चित्रपटसृष्टीतील त्यांचे मित्रसुद्धा हा फोटो पाहून थक्क झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची स्पर्धक रेशम टिपणीस हिने कमेंटमध्ये लिहिलं, ‘तू कॉलेजमध्ये असल्यासारखा तरुण व हँडसम दिसतोय.’ तर ‘घाडगे अँड सून’ फेम सुकन्या मोने यांनी लिहिलं, ‘मी तुला विचारणारच होते की तू वजन कमी करण्यासाठी काय केलंय?’ त्यावर डाएटशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही, असं उत्तर मांजरेकरांनी दिलं.