त्या घरात वाद रंगले आणि मैत्रीही झाली.. बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. जवळपास १०० दिवसांचा हा खेळ अखेर संपणार आहे आणि प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचा पहिला विजेता मिळणार आहे. या प्रवासाच बरेच वाद चर्चेचे ठरले आणि सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रेशम टिपणीस आणि राजेश श्रुंगारपुरे यांच्या मैत्रीची. याविषयी आता स्वत: राजेशने प्रतिक्रिया दिली आहे.
रेशमसोबतच्या नात्याविषयी तो म्हणाला की, ‘बिग बॉस मराठीच्या घरात फक्त खेळ होता. त्या गोष्टी झाल्या आणि आता मी बाहेर पडलोय तर माझ्या खऱ्या जगात वावरतोय. रेशमसोबत माझी निव्वळ मैत्री होती.’ बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर रेशमने एका मुलाखतीत राजेशवर काही आरोप केले होते. राजेशने त्याच्या काही मर्यादा ओलांडल्या असा धक्कादायक आरोप तिने केला होता. रेशमची ही प्रतिक्रिया मला अपेक्षित होती आणि त्यावर मला काही भाष्य करायचं नाहीये असं म्हणत राजेशनं हा विषय टाळला.
एकीकडे सई, मेघा आणि पुष्कर यांपैकी एखादा विजेता ठरणार असल्याची शक्यता अनेकांकडून वर्तवण्यात येत असताना राजेशने मात्र ‘सरप्राइज विजेता’ समोर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्मिता गोंदकर बिग बॉस मराठीची विजेती ठरू शकते असं तो म्हणतो. ‘पहिल्या दिवसापासून स्मिता प्रामाणिकपणे खेळत आहे. तोंडासमोर एक आणि पाठीमागे एक असा तिचा स्वभाव नाही. व्यक्ती म्हणून ती घरात छान वागली,’ असं राजेश म्हणाला. तर दुसरीकडे मेघा धाडे ‘फेक गेम’ खेळते अशी टीकासुद्धा त्याने केली.
बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना राजेशने स्मिताविषयी व्यक्त केलेला अंदाज महत्त्वपूर्ण ठरतो. येत्या रविवारी याचा उलगडा होणार असून कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.