छोट्या पदद्यावरील कायम चर्चेत असलेला शो म्हणजेच ‘बिग बॉस’. यंदा मात्र ‘बिग बॉस’ दोन वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील ‘बिग बॉस १५’ ओटीटी व्हर्जनची सुरवात झाली असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. निर्माता करण जोहार या खास शोचा होस्ट आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची नावं आता अखेर समोर आली आहेत. या यादीत शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी देखील सामील आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. राज कुंद्राच्या अटकेपासूनच शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारली जात होती. यानंतर आता शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात गेली असून तिची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

शमिता शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बूमरँग शेअर केलं होता. यात ती हातात एक वाघाचा मास्क घेऊन चेहरा लपवते आणि नंतर तो मास्क बाजूला ठेवला आहे. ही पोस्ट शेअर करत, “स्वतःला लपवू नका, ताठ मानेने उभे रहा आणि तुमचं कर्तृत्व इतरांना दाखवून द्या” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय. शमिताने ती पोस्ट शेअर करताच तुफान व्हायरल झाल्याचे दिसून आले.

दरम्यान शोमध्ये एण्ट्री घेताना शमिता शेट्टीने करण जोहरशी मोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी कुटुंबावर आलेल्या कठीण काळातही तिने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? या गोष्टीचा खुलासा केला. यावेळी आपण कुटुंबावर संकट येण्याआधीच शोसाठी कमिटमेंट दिली असल्याचे तिने सांगितले. ज्यावेळी सर्व काही सुरळीत होतं तेव्हा कमिटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणं आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत असल्याचं शमिता म्हणाली. यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राचं नाव घेणं मात्र टाळलं

या आधी देखील शमिता शेट्टी ‘बिग बॉस’या शोच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र काही दिवसातच शमिता शोमधून बाहेर पडली. शिल्पा शेट्टीच्या लग्नामुळे शमिताला शो सोडावा लागला होता.