First Indian Actor who Charged 1 Crore per Film : आता भारतीय चित्रपटांचे बजेट आणि कलेक्शन याचा विषय निघाला की तो आकडा कोटींमध्येच असतो. आघाडीच्या अभिनेत्यांनी आता चित्रपटासाठी २० ते ५० कोटींपर्यंत मानधन घेणे खूप सामान्य आहे. मात्र ९० च्या दशकात सिनेसृष्टीत अभिनेत्यांना मानधन लाखांमध्ये मिळायचं. भारतात एक कोटी रुपये मानधन घेणारा पहिला अभिनेता कोण, तुम्हाला माहीत आहे का? या अभिनेत्याने ३२ वर्षांपूर्वी एका सिनेमासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये आकारले होते.

अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर – शाहरुख यांच्यापैकी कुणीही इतकं मानधन ९० च्या दशकात घेतलं नव्हतं. मुळात कोट्यवधींमध्ये मानधन घेणारा पहिला अभिनेता बॉलीवूड स्टार नाही. प्रादेशिक सिनेमातील सुपरस्टारने सर्वात आधी कोटींमध्ये मानधन घेतलं होतं. तेलुगू मेगास्टार चिरंजीवी हे कोटींमध्ये मानधन घेणारे पहिले स्टार होय.

हेही वाचा – काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

एका चित्रपटासाठी एक कोटी घेणारा पहिला भारतीय अभिनेता

१९९२ मध्ये तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी ‘बिगर दॅन बच्चन’ या मथळ्यासह ‘द वीक’ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकले होते. त्या काळी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठा असं एका अभिनेत्याला म्हणणं अपमानजनक होतं, मात्र त्यावेळी ‘द वीक’कडे ते लिहिण्याचं मोठं कारण होतं. चिरंजीवी यांनी ‘आपडबंधवुडू’ सिनेमासाठी तब्बल १.२५ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी ‘खुदा गवाह’ नंतर थोडा ब्रेक घेतला होता. त्यावेळी चिरंजीवी हे सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय अभिनेते होते. तेव्हा रजनीकांत, कमल हासन आणि सनी देओल यांसारखे इतर टॉप स्टार प्रत्येक चित्रपटासाठी ६० ते ८० लाख रुपये घ्यायचे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा – धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

हळूहळू वाढली एक कोटी घेणाऱ्या अभिनेत्यांची सख्या

हळूहळू एक कोटी घेणाऱ्या अभिनेत्यांची संख्या वाढू लागली. चिरंजीवी, रजनीकांत, यांच्यानंतर कमल हासन यांनी १९९४ मध्ये एका चित्रपटासाठी एक कोटी मानधन घेतलं. त्यानंतर १९९६ मध्ये अमिताभ बच्चन पुन्हा एकदा स्क्रीनवर परत आले. तेव्हापासून तेही एक कोटी मानधन घेऊ लागले. एक कोटी मानधन घेणारे ते पहिले बॉलीवूड स्टार होते. त्याच वर्षी श्रीदेवी एका चित्रपटासाठी एवढी फी घेणाऱ्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. यानंतर चित्रपट पडद्यावर चांगली कामगिरी करू लागले आणि आर्थिक गणितं बदलली. त्यामुळे बॉलीवूडचे टॉप स्टार्स जास्त पैसे घेऊ लागले. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान प्रत्येक चित्रपटासाठी २-३ कोटी आकारू लागले.

हेही वाचा – ‘कबूल है’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, देवभूमीतील नॅशनल पार्कमध्ये केलं लग्न, फोटो आले समोर

तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार – चिरंजीवी

चिरंजीवी ९० च्या दशकातील तेलुगू सिनेसृष्टीचे सुपरस्टार होते. त्यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. २००८ मध्ये त्यांनी राजकारणासाठी सिनेसृष्टी सोडली. मात्र २०१७ मध्ये ते रुपेरी पडद्यावर परतले. ‘कैदी नंबर 150’ आणि ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. मग त्यांनी ‘गॉडफादर’ आणि ‘वॉल्टेअर वीरय्या’ सारखे इतर हिट चित्रपट दिले. ६९ वर्षांचे चिरंजीवी तेलुगूतील आघाडीचे स्टार आहेत. ते आता एका सिनेमासाठी ४० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात.

चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट ‘विश्वंभरा’ आहे. या चित्रपटात त्रिशा, मीनाक्षी चौधरी व कुणाल कपूर यांच्याही भूमिका आहेत. मल्लिदी वशिष्ठ दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.