‘लाडक्या बापाची लाडकी लेक’ असं तिचं बॉलीवूडमध्ये वर्णन केलं जातं. आणि ती तशीच आहे, पण लाडाने बिघडलेली मात्र अजिबात नाही. किंबहुना, मी जे करेन ते योग्यच आहे याची ग्वाही माझ्या वडिलांकडूनच तुम्हाला मिळेल, असं सोनम कपूर ठणकावून सांगते. पण तिचं म्हणणं अजिबात चुकीचं नाही हे तिच्या बिकीनी दृश्यावरून जो गहजब झाला आहे त्यावर अनिल कपूर यांनी केलेल्या विधानावरूनच सिद्ध झालं आहे. ‘बेवकू फियाँ’ या आगामी चित्रपटासाठी सोनमने बिकीनी दृश्य दिलं आहे. त्यावरून तिच्यावर सध्या प्रश्नांचा भडिमार चालू आहे. अनिल कपूर यांनी मात्र तुझ्या या दृश्याने चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळले, असं माफक उत्तर देऊन सोनमच्या कृतीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या या अत्यंत समजूतदार आणि व्यावाहरिक स्वभावामुळेच आमचं घरच चित्रपटसृष्टीत रंगलंय.. असं सांगणाऱ्या सोनमकडून तिच्या आगामी चित्रपटांविषयी, तिच्या आवडींविषयी आणि तिच्या लाडक्या वडिलांविषयी मारलेल्या गप्पा..
* ‘बेवकूफियाँ’ हा मसाला चित्रपट नाही पण म्हणून त्याच्या प्रसिद्धीसाठी बिकीनी दृश्याची गरज सोनमला भासते आहे?
या चित्रपटात बिकीनी दृश्य असावं ही माझीच कल्पना होती. हे खरं आहे की ‘बेवकूफियाँ’ हा अजिबात मसाला चि़त्रपट नाही. उलट तो आजच्या तरुणांच्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या विषयावर विनोदी पद्धतीने बोट ठेवणारा सिनेमा आहे. मायरा नावाची माझी व्यक्तिरेखा आहे. हसरी, खेळकर, दिलखुलास आयुष्य जगणारी मायरा एका तरुणाच्या प्रेमात पडते. दुर्दैवाने त्याची भल्यालठ्ठ पगाराची नोकरी गेलेली आहे. पण प्रेमापायी वडिलांना याची कल्पना न देता लग्न करायचा निर्णय ते दोघे घेतात आणि तिथून मग एक खोटं, अनेक खोटं अशी जी गमतीदार चुकांची मालिका सुरू होते त्या ‘बेवकूफियाँ’ची ही क था आहे. मायराच्या जीवनशैलीनुसार या कथानकात रिसॉर्ट, स्विमिंग पूल अशा गोष्टींचा भरणा होता. त्यामुळे मीच ही कल्पना सुचवली की मायराच्या व्यक्तिरेखेत मी एकदम फिट बसते आहे. सध्या मी बारीकही झाले आहे त्यामुळे बिकीनीमध्ये मायरा म्हणजे मी छान दिसेन.. त्यामुळे यात प्रसिद्धीचा प्रश्नच येत नाही. मला वाटलं तसं असावं, मी सुचवलं आणि दिग्दर्शकाने ते छान चित्रितही केलं आहे.
*मायरासारख्याच तुझ्या आधीच्या भूमिकाही जिद्दी, खेळकर, अवखळ मुलींच्या होत्या. ही निवड जाणीवपूर्वक आहे का?
मी त्या व्यक्तिरेखांमध्ये फिट बसते का? हा माझा पहिला प्रश्न असतो, अर्थात स्वत:शीच केलेला. ‘साँवरिया’मधली नाजूकशी सकीना असेल, ‘दिल्ली ६’ मधली हट्टी बिटटु, ‘मौसम’मधली अयात, ‘आयेशा’, ‘भाग मिल्खा भाग’ची बिरो किंवा ‘रांझना’ची झोया या सगळ्या फार वेगवेगळ्या आहेत. त्यांचं असणं-दिसणं आणि वागणं यात वेगळेपणा आहे. आणि लोकांना वरवर वाटत असेल की मी जिद्दी आहे, थोडीशी हट्टी आहे पण मी खरोखर तशी नाही आहे. त्यामुळे कुठलीही व्यक्तिरेखा माझ्यासमोर आली की मी त्या भूमिकेत कशी दिसेन, कशी वागेन या प्रश्नांची उत्तरं शोधते. ती मला पटली आणि वाटलं की अरे ही झोया मीच रंगवू शकते तेव्हाच त्या चित्रपटासाठी मी होकार देते. यात माझे वडीलही कधी हस्तक्षेप करत नाहीत किंवा अमुक एक भूमिका करू नको, असे सल्लेही देत नाहीत.
*वडिलांचाच उल्लेख केला आहेस तर ‘द अनिल कपूर’ यांच्याविषयी तुला काय वाटतं?
माझे वडील हे ‘ट्रेंडसेटर’ आहेत. ज्या काळात अमिताभ बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेचा प्रभाव चित्रपटांवर होता. त्या काळात एक अभिनेता म्हणून माझ्या वडिलांनी ‘मशाल’, ‘ईश्वर’ असे वेगळे चित्रपट केले. त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली, स्वत:साठीचं स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केलं आणि आजही त्यांनी स्वत:चा तो लौकिक कायम राखला आहे. आपला अभिनय आणि चित्रपटनिर्मितीचा व्यवसाय सांभाळून ‘२४’ सारखी अॅक्शनपॅड मालिका टीव्हीवर आणणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. माझ्या वडिलांचं हे निरीक्षण होतं की अरे, आपल्याकडच्या वाहिन्यांवर अजूनही सास-बहू राडा चालू आहे. लोकांना काहीतरी वेगळं पाहायची सवय लावायला हवी आणि त्यासाठी वेगळं काही निर्माण करायला हवं. त्यांनी आपली कमाई या शोसाठी पणाला लावली आणि त्यांनी तो ट्रेंड बदलून दाखवला. भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार पावलं उचलणारी माणसं फार कमी असतात त्यामुळे मला त्यांच्याविषयी फार आदर वाटतो.
*वडिलांचा कुठला चित्रपट पुन्हा करायला आवडेल?
त्यांच्या चित्रपटांचे विषय खरं म्हणजे त्यांच्या त्या पिढीबरोबर संपलेत असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या त्यावेळच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असलं ना तरी आत्ताच्या पिढीने ते पाहावेतच, असं काही त्यात फार नव्हतं, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याच चित्रपटाचा रिमेक वगैरे करावा, असं मला वाटत नाही. जुन्यात रमण्यापेक्षा नव्याचा शोध घ्यावा, हे माझं तत्त्व आहे. अपवाद फक्त ‘मिस्टर इंडिया’चा. त्यांचा तो चित्रपट म्हणजे वैज्ञानिक-काल्पनिक कथा होती ती आजच्या काळात अजून छान रंगवता येईल, असं वाटतं.
रिमेक करायचेच झाले तर मी हृषीकेश मुखर्जीच्या चित्रपटाचे करेन. कारण त्यांचे चित्रपट मला आजही आवडतात. त्यात कौटुंबिक नात्यांचं महत्त्व, आपली मूल्यं, तत्त्व ती त्यांच्या त्या चित्रपटांमधून जपली गेलेली आहेत आणि त्यामुळे आजही ती तितकीच महत्त्वाची वाटतात. म्हणूनच, आम्ही ‘खूबसुरत’ चित्रपट करतो आहोत. पण हा मूळ ‘खूबसूरत’चा रिमेक नाही हे मला आवर्जून सांगायचं आहे. नव्या चित्रपटासाठीची प्रेरणा त्यातून घेतली आहे. नव्या चित्रपटात मंजूची नाही तर मिलीची कथा तुम्हाला पाहायला मिळेल.
*फिल्म, फॅशन याच्या पलीकडे जाऊन सोनमला काय आवडतं
या प्रश्नावर एका झटक्यात उत्तर मिळतं ते ‘राजकारण’. मला राजकारणात खूप रस आहे. म्हणूनच मी आता राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर एक चित्रपट करते आहे. ‘बॅटल फॉर बिटोरा’ हे अनुजा चौहान यांचं पुस्तक मी वाचलं होतं. ते मला खूप आवडलं आणि म्हणून त्याच्यावर चित्रपट करायचा निर्णय घेतला. आमच्याच होम बॅनरखाली निर्मिती होणार आहे. सध्या त्याच्या पटकथा लेखनाचं काम सुरू आहे.
लोकांना वरवर वाटत असेल की मी जिद्दी आहे, थोडीशी हट्टी आहे पण मी खरोखर तशी नाही आहे. त्यामुळे, कुठलीही व्यक्तिरेखा माझ्यासमोर आली की मी त्या भूमिकेत कशी दिसेन, कशी वागेन या प्रश्नांची उत्तरं शोधते. ती मला पटली आणि वाटलं की अरे ही झोया मीच रंगवू शकते तेव्हाच त्या चित्रपटासाठी मी होकार देते. यात माझे वडिलही कधी हस्तक्षेप करत नाहीत किंवा अमूक एक भूमिका करू नको, असे सल्लेही देत नाहीत.
लाडली, पण न बिघडलेली..
‘लाडक्या बापाची लाडकी लेक’ असं तिचं बॉलीवूडमध्ये वर्णन केलं जातं. आणि ती तशीच आहे, पण लाडाने बिघडलेली मात्र अजिबात नाही.
First published on: 02-03-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bikini scene will get bewakoofiyan a good opening sonam kapoor