Oscar Awards 2024: संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला २०२४चा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज पहाटे मोठ्या दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक गोष्टींमुळे विशेष आणि वेगळा ठरला. याचे कारण म्हणजे विजेते. यंदा अनेकांना पहिल्यांदाच प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला तर काहींनी हा पुरस्कार जिंकून रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास रचला.
सध्या ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील विजेत्या बहीण-भावाची चर्चा होतं आहे. या बहीण-भावाच्या जोडीने कमी वयात दोन वेळा ऑस्कर जिंकून ८७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. बिली आयलिश (Billie Eilish) व फिनियस ओ’कॉनल (Finneas O’Connell), असं या भावंडांचं नाव आहे. या दोन भावंडांनी एकदा नव्हे तर दोनदा ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे.
हेही वाचा – Oscars 2024: ऑस्करच्या रेड कार्पेटवर पडली प्रसिद्ध अभिनेत्री, विनोद करत म्हणाली, “मी माझा विमा…”
सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत अनेक प्रसिद्ध व गीतकारांना नामांकन मिळालं होतं. पण २२ वर्षांची बिली आयलिश व २६ वर्षांचा फिनियस ओ’कॉनल या बहीण-भावाच्या जोडीने बाजी मारली. ‘बार्बी’ चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर’ या गाण्यासाठी दोघांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. ९६वा अकादमी पुरस्कार जिंकून बिली व फिनियसने ३० वर्षांखालील वयोगटात दोन वेळा ऑस्कर जिंकण्याचा इतिहास रचला आहे. याआधी २८ वर्षांच्या लुसी रेनरला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
प्रतिष्ठित ऑस्कर जिंकल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना बिली आयलिश भावुक झाली. ती म्हणाली, “याचं श्रेय त्या प्रत्येक व्यक्तीला आहे, ज्यानं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.” दरम्यान बिली व फिनियस या जोडीला २०२१ मध्ये जेम्स बॉन्ड थीम साँग ‘नो टाइम टू डाई’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
सर्वोत्कृष्ट गाणी – नामांकन
आय एम जस्ट केन (मार्क रॉनसन, एंड्रयू व्याट)
इट नेव्हर वेन्ट अवे (डैन विल्सन, जोनाथन बैटिस्टे)
वाहजहजह (स्कॉट जॉर्ज)
द फायर इन्साइड (डायने वारेन)
व्हॉट वॉज आय मेड फॉर (बिली आयलिश व फिनियस ओ’कॉनल)