काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधून यूट्यूबर ‘बिंदास काव्या’ अचानक बेपत्ता झाली होती. बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे समाजमाध्यमांवर ती चर्चेचा विषय ठरली होती. ती बेपत्ता झाल्यामुळे तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती आणि पोलिसांनीही त्याप्रमाणे तपास सुरु केला. त्यानंतर काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती. मात्र आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा : क्रूर औरंगजेब, छत्रपती शिवरायांचे बुद्धीचातुर्य अन् आग्र्याहून सुटकेचा थरार; अंगावर काटा आणणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर प्रदर्शित

बिंदास काव्या बेपत्ता होणं हे काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी ठरवून केले होते. काव्या आणि तिच्या कुटुंबाने केवळ फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी काव्या बेवत्ता असल्याचे भासवले असल्याचे समोर आले आहे. घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली असल्याचे शुल्लक कारण काव्या परतल्यावर तिच्या घरच्यांनी सांगितले होते. मात्र तो सगळा बनाव होता.

बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी माहिती देताना सांगितले की, “दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट झालय. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं.” प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी मिळून केलेल्या या कृतीने निव्वळ फॅन फॉलोअर्स वाढवून पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : औरंगाबादची युट्यूबर ‘बिंदास काव्या’ बेपत्ता, मदतीचं आवाहन करणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर बिंदास काव्या हे सोशल मीडियावर प्रसिद्ध नाव आहे. ‘बिंदास काव्या’ या यूट्यूब चॅनलमुळे चाहते काव्याला ओळखतात. ९ सप्टेंबर रोजी काव्याच्या पालकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की त्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे, त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं.