गौतमी ‘कपूर’पेक्षा ‘गाडगीळ’ हेच नाव मराठी घरांमध्ये लोकप्रिय आहे. दिलखुलास स्वभावाची ही ‘बिनधास्त’ गौतमीची छाप अजूनही इथल्या मनामनांवर पक्की आहे. आपल्या कारकीर्दीच्या यशस्वी टप्प्यावर तिने अभिनेता राम कपूरशी लग्न केले आणि पडद्यावरून ती गायब झाली. प्रत्येक ‘यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, असे म्हणतात. राम कपूरच्या यशामागे गौतमीचा वाटा मोठा होता. एकीकडे राम कपूर स्वत:ची कारकीर्द सावरत असताना, गौतमीने घराची आणि दोन मुलांची जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली. लवकरच ती ‘तेरे शहर में’ या ‘स्टार प्लस’वरील मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या वेळी मालिकांच्या माध्यमातून ती साकारत असलेली आई आणि प्रत्यक्ष जीवनातील गौतमी यात फारसा फरक नसल्याचे ती सांगते.
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून काम करणाऱ्या गौतमीने जेव्हा काम थांबवून घरी थांबण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो खरा तिच्यासाठीही एक महत्त्वाचा आणि कठीण निर्णय होता, हे ती मान्य करते. गृहिणी म्हणून तिने आपली जबाबदारी लीलया पार पाडली. पण, कुठे तरी तिच्यातली अभिनेत्री तिला सतत खुणावत होती. ‘अजून काही काळ मी काम केले नसते, तर मला वेड लागले असते’, असे ती मिश्किलीने सांगते. त्यामुळे मुलं वयात येत असतानाच त्यांना एक ना एक दिवस आई कामानिमित्त घराबाहेर पडणारच अशी त्यांच्या मनाची तयारी करून ठेवली होती. ती आणि राम दोघांच्याही मालिका कमी-अधिक फरकाने एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष देता येणार नाही, हे तिने मान्य केले होते. पण, मुलांकडे दुर्लक्ष मात्र होणार नाही, यासाठीही ती तितकीच दक्ष आहे.
नव्या मालिकेतही ती आईची भूमिका साकारत आहे. मागताच क्षणी मुलांना सर्वकाही देऊन आईवडिलांच्या अतिप्रेमाने बिघडलेली मुले हा या मालिकेचा विषय आहे. याबद्दल बोलताना तिच्यातली आईही जागी होते. पैसा हातात असला तरी, मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्या आईवडिलांवर असते. त्यांच्या गरजा आणि मागण्यांवर पालकांचे लक्ष असलेच पाहिजे असे ती सांगते. घरात ती स्वत: आपल्या मुलांसोबत याबाबतीत कठोरपणे वागते, असे तिने सांगितले. आपण त्यांच्यासाठी एक ‘गिफ्ट कॅलेंडर’ बनवले असून, त्यांना जर भेटवस्तू हवी असेल तर ती त्यांना मेहनतीने कमवायला लागते, सहज काहीच मिळत नाही. अर्थात, त्यामुळे मुलांसमोर आपली ‘दुष्ट’ आई प्रतिमा असली, तरी त्यात तिला काहीच गैर वाटत नाही. यामुळेच राम मात्र मुलांचा लाडका असल्याचे ती सांगते. कारण ‘पार्टी, भेटवस्तू म्हणजे बाबा’ असे समीकरण बनले आहे. परंतु, रामना घरी जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरवताना त्यांना अडवताही येत नसल्याचे ती सांगते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा