अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाला कुटुंबियांकडून अखेर होकार मिळाला असून पुढील महिन्यात हे दोघेजण विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. करणची आई बिपाशाला सून म्हणून स्विकारण्यास तयार झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ३० एप्रिलला मुंबई उपनगरातील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र, आत्तापर्यंत दोघांकडूनही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बिपाशा आणि करणच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरू शकतो.
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली होती. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले. दरम्यान, करणने त्याची पत्नी जेनेफरशी घटस्फोट घेतल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. २०१२ साली करणचे जेनेफरशी लग्न झाले होते.

Story img Loader