गेले वर्षभर बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर यांच्या प्रेमसंबंधांविषयी चर्चा सुरू होती. मात्र याआधीही बिपाशाचे नाव अनेक जणांशी जोडले गेले असल्याने करणबरोबरचे तिचे नाते किती काळ टिकणार, याबद्दल शंकाच जास्त होती. बिपाशाने स्वत:च आपल्या लग्नाची तारीख जाहीर करून या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. करण आणि बिपाशा ३० एप्रिलला विवाहबद्ध होणार आहेत.
‘अलोन’ या भूषण पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदाच एकत्र आले. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची प्रेमकथेची सुरुवात झाली आणि चित्रपट संपेपर्यंत ती सुफळही झाली. जॉन अब्राहमशी असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर बिपाशाने कधीही लग्नाचा विषय गांभीर्याने घेतला नव्हता.
त्यावेळी तिने आपल्या चित्रपट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करणे पसंत केले होते. मात्र गेल्या काही वर्षांत भयपटांच्या साच्यात अडकलेल्या बिपाशाची चित्रपट कारकीर्दही तिथेच अडकून पडली आहे. माझ्याकडे भयपटच जास्त येतात. त्यामुळे येत्या काही वर्षांत मी ‘हॉरर क्वीन’ बनेन, अशा वल्गना करणाऱ्या बिपाशाने आपल्याला इतर चित्रपट मिळत नसल्याचेही मुलाखतीदरम्यान कबूल केले होते. आणि त्याचवेळी आपण विवाह करून स्थिरस्थावर होण्यास उत्सुक असल्याचे संकेतही तिने दिले होते. लग्न हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांना जाहीरपणे सांगून, आईची-घरच्यांची संमती घेऊनच लग्न करणार असल्याचे तिने म्हटले होते.
योगायोगाने, ‘अलोन’च्या सेटवर करणशी झालेली तिची ओळख प्रेमात आणि आता लग्नाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचली आहे. एकेकाळी छोटय़ा पडद्यावर ‘दिल मिल गये’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगमशी विवाह केला होता. लग्नानंतर दहा महिन्यांतच श्रद्धापासून घटस्फोट घेणाऱ्या करणने ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची सहकलाकार जेनिफर विंजेटशी विवाह केला होता. मात्र २०१४ मध्ये जेनिफर आणि करण विभक्त झाले.
त्याचवेळी करणने छोटय़ा पडद्यावरून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. आणि पहिल्याच चित्रपटातील त्याची सहकलाकार बिपाशाशी तो आता विवाहबद्ध होणार आहे. आपले निकटवर्तीय आणि मित्रांच्या उपस्थितीत छोटेखानी खासगी समारंभात हा विवाह होणार असल्याचे बिपाशाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा