दिग्दर्शक साजिद खानच्या हमशकल्स चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमापासून दूर राहिलेली चित्रपटातील अभिनेत्री बिपाशा बसूने अखेर मौन सोडले असून, चित्रपट पूर्ण झाल्यावर तो तितकासा समाधानकारक न वाटल्याने आपण चित्रपटापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे तिने म्हटले आहे. साजिद खानच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असलेली बिपाशा चित्रपटाच्या सर्व प्रसिद्धी कार्यक्रमापासून जाणिवपूर्वक दूर राहिली होती. या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या या विनोदी चित्रपटातील तीन प्रमुख नायिकांपैकी एक असलेल्या बिपाशाने टि्वटरवर याबाबतचा खुलासा केला.
चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमापासून दूर असलेल्या बिपाशाबाबत विचारणा होत असताना तिला बरे वाटत नसून, लवकरच ती प्रसिद्धी कार्यक्रमाचा भाग होणार असल्याचे चित्रपटकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. परंतु, अलिकडेच पार पडलेल्या नवी दिल्ली येथील चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात बिपाशाच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी साजिद खानला छेडले असता तीच चांगल्याप्रकारे याचे उत्तर देऊ शकत असल्याचे त्याने म्हटले होते. यानंतर दोनच दिवसांनी बिपाशाने याबाबतचे आपले मौन सोडले आणि ती म्हणाली, हमशकल्सच्या प्रसिद्धी कार्यक्रमात माझ्या अनुपस्थितीबाबत होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकणे गरजेचे आहे. निव्वळ विश्वासानेच एखाद्या चित्रपटाचा भाग होण्याची जबाबदारी मी घेते. परंतु, या चित्रपटातील माझ्या व्यक्तिरेखेचे डबिंग केल्यानंतर, चित्रपटाचा अंतिम रिझल्ट चांगला न झाल्याचे पाहून मी खूप विचलीत झाले.
आपल्या या खुलाशात बिपाशाने चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानचा नामोल्लेख टाळला. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटातील अन्य कनिष्ठ अभिनेत्री तमन्ना आणि इशा गुप्तापेक्षा दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने बिपाशा नाराज असल्याचे समजते. असे असले तरी बिपाशाला इशा आणि तमन्नापेक्षा जास्त मानधन मिळाले असून, चित्रपटात महत्वाची भूमिकादेखील देण्यात आली आहे. सैफ अली खानबरोबरच्या खास प्रोमोचेदेखील आश्वासन तिला देण्यात आले होते.
Movies are our life.They are made by efforts of lots of ppl!I can never be against a film!As an actor ur role can disappoint u at times.
— Bipasha Basu (@bipsluvurself) June 17, 2014
आपल्या खुलाशात ती लिहिते, अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे चित्रपटाची प्रसिद्धी कशी करावी ते मला कळले नाही आणि त्यामुळेच मी यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. ‘फॉक्स एन्टरटेन्मेंट’ ज्यांच्याबरोबर मी राझ-३ हा चित्रपट केला आणि वासुजी जे एक महान निर्माता आहेत, त्यांना मी सदिच्छा देते. सैफ, रितेश, तमन्ना, इशा आणि चित्रपटाशी संबंधित अन्य सर्वांना मी शुभेच्छा देते. काही प्रवास पूर्ण होऊ शकत नाहीत, हा प्रवासदेखील त्यापैकीच एक आहे. कोणाचाही दोष नाही, अनेक घटनांमुळे मी व्यथित झाले आहे. हमशकल्स या विनोदी चित्रपटात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर तिहेरी भूमिकेत दिसणार असून, तमन्ना, बिपाशा बसु आणि इशा गुप्ता या नायिका चित्रपटात आहेत. केवळ ७० दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.