एखादा कलाकार एकाच प्रतिमेत लोकप्रिय ठरला, की त्याला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका दिल्या जातात. एकापाठोपाठ एक अशा एकाच शैलीच्या भूमिका केल्यानंतर तीच त्याची ओळख होऊन बसते. त्यातून बाहेर पडणे त्या कलाकाराला अवघड होऊन बसते. हे दुष्टचक्र भेदणे बॉलीवूडची ‘बाँग ब्युटी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री बिपाशा बासूलाही शक्य झाले नाही. ‘राज’पासून आत्ताच्या ‘अलोन’पर्यंत बिपाशाने इतके हॉररपट केले आहेत की, आता तिच्याबद्दल काही वेगळा विचार करावा असे चित्रपटकर्मीनाही वाटेनासे झाले आहे. सध्या मोठय़ा पडद्यावर तेच तेच करून कंटाळलेल्या बिपाशाला छोटय़ा पडद्यावर संधी मिळाली आहे. मात्र, इथेही ती लोकांना घाबरवण्याचेच काम करणार आहे.
बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक विक्रम भट्ट हा हॉररपटांचा मास्टर म्हणून ओळखला जातो. ‘राज’ या पहिल्या हॉररपटापासून विक्रम आणि बिपाशाची जोडी जमली, ती अजूनही कायम आहे. हॉररपट आपल्याला चांगले जमतात, लोकांना ते आवडतात, त्यामुळे ते करायची ऑफर आली तर नकार द्यावासा वाटत नाही, असे बिपाशाने मुलाखतीदरम्यान म्हटले होते. स्वत: अंधारालाही घाबरणाऱ्या बिपाशाला मोठय़ा पडद्यावर मात्र, याच अंधाराचा सामना करावा लागतो; पण ते तिच्याही इतके अंगवळणी पडले आहे की, तिला त्यात काही वावगे वाटत नाही. ‘अलोन’नंतर बिपाशाने अजून चित्रपट स्वीकारलेला नाही. त्याच्यामागे तिचे छोटय़ा पडद्यावरचे पदार्पण हे कारण असावे. टेलीव्हिजनवर एका मर्यादित भागांच्या हॉरर मालिकेचे सूत्रसंचालन बिपाशा करणार आहे. ‘डर सबको लगता है’ असे या मालिकेचे नाव असून यात छोटय़ा छोटय़ा हॉरर क था दाखवण्यात येणार आहेत. ‘अँड टीव्ही’ या नव्या वाहिनीवर ही मालिका दाखवण्यात येणार असून त्यातील कथा बिपाशाच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. या मालिके त वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेल्या कथांचे भाग पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या भागांचे काम एकच सर्जनशील दिग्दर्शक पाहणार असल्याचे मालिकेशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. दर आठवडय़ाला एक अशा पद्धतीने ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर गुंतलेल्या मोठय़ा बॉलीवूड कलाकारांच्या मांदियाळीत तिचेही नाव सामील झाले आहे.
बिपाशा बासू छोटय़ा पडद्यावरूनही घाबरवणार
एखादा कलाकार एकाच प्रतिमेत लोकप्रिय ठरला, की त्याला त्याच त्याच प्रकारच्या भूमिका दिल्या जातात.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 02-10-2015 at 07:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu to make tv debut in horror show