‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये रेल्वे स्टेशनवर पब्लिकच्या हातून धुलाई होणारा मवाली आठवतोय? कदाचित त्या वेळी कोणाचेही लक्ष त्याच्याकडे गेले नसेल. पण सध्या तोच ‘मवाली’ हिंदू चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता बनला आहे. ‘कहानी’मधील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील हा अभिनेता सध्या बॉलिवूडच्या एका हॉट मदनिकेबरोबर काम करत असून ती मदनिका चक्क त्याच्या प्रेमातच पडली आहे. चर्चा सुरू आहे ती नवाझुद्दिन सिद्धिकी आणि बिपाशा बासू यांची! सध्या ‘आत्मा’ या चित्रपटात दोघेही एकत्र काम करत आहेत. ‘गँग्ज ऑफ वास्सेपूर’मधून पुढे आलेला नवाझुद्दिन ‘तलाश’मध्ये लंगडा तैमूर म्हणूनही दिसला होता. अत्यंत बोलके डोळे, धारदार अभिनय यांमुळे पटकन लोकांच्या नजरेत भरलेल्या नवाझुद्दिनला नवनव्या ऑफर्स न येत्या, तरच नवल! गेल्या वर्षभरात त्याच्या चाहत्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच एक नाव आहे बिपाशा बासूचे. नवाझुद्दिनसह काम करायला मिळत असल्याने बिपाशा सध्या आभाळात तरंगत आहे. पण नवाझुद्दिन आणि बिपाशा पहिल्यांदाच एकमेकांना सेटवर भेटले, त्या वेळी नवाझुद्दिन बिपाशाच्या स्टारडमपुढे दबून गेला होता. गंमत म्हणजे बिपाशाचीही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. रंगभूमीवर आपल्या अभिनयामुळे दबदबा निर्माण करणाऱ्या नवाझुद्दिनच्या अभिनयाची तारीफ बिपाशानेही ऐकली होती. त्यामुळे बिपाशा त्याच्या अभिनयावर भाळली होती. नवाझुद्दिनसमोर आपण अत्यंत नगण्य अभिनेत्री असल्याचेही तिने खुल्या दिलाने कबूल केले. आपण केवळ अभिनयाच्या झेरॉक्स कॉपी काढतो. खरा अभिनय तर नवाझुद्दिन करतो, असे म्हणण्याइतपत बिपाशाची मजल गेली आहे. नवाझुद्दिन अत्यंत पद्धतशीरपणे भूमिका बजावतो. पात्र उभे करताना तो त्याचा चोख अभ्यास करतो. त्या पात्राच्या खास लकबी शोधून काढतो व मगच कॅमेरासमोर उभा राहतो. त्याने अभिनयाचे रितसर प्रशिक्षण घेतले असल्याने त्याला ती सहजता साधली आहे, असे बिपाा सांगते. आपल्या सहकलाकाराची एवढी स्तुती केली की, बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावतात, हे बिपाशासाठी नव्याने सांगायला नको!

Story img Loader