तनुजा म्हटलं की आपल्यासमोर येतं तिचं ‘रात अकेली है बुझ गये दिये’ हे गाणं. तनुजा या एका मराठमोळ्या घरात जन्माला आल्या. सिनेमात काम करण्याचा वारसा म्हणा किंवा बाळकडू हे त्यांच्या घरातूनच त्यांना मिळालं. कुमारसेन समर्थ आणि शोभना समर्थ यांच्या त्या कन्या. अभिनेत्री नूतन या तनुजा यांची सख्खी बहीण. तनुजा यांनी १९५० पासून अभिनय करायला सुरुवात केली. हमारी बेटी हा त्यांचा पहिला सिनेमा होता. यात तनुजा बालकलाकार म्हणून त्यांची बहीण आणि अभिनेत्री नूतन यांच्यासह झळकल्या होत्या. इथपासून सुरु झालेली त्यांची कारकीर्द २०२२ मध्ये आलेल्या मॉडर्न लव्ह या अॅमेझॉनवर आलेल्या वेब सीरिजपर्यंतची आहे. तनुजा यांचा आज वाढदिवस. हिंदी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि बिनधास्त मराठमोळी अभिनेत्री असा त्यांचा लौकिक होता.

कुटुंब आर्थिक अडचणीत आलं आणि तनुजा अभिनयाकडे वळल्या

तनुजा या त्यांच्या घरातल्या चौथ्या अभिनेत्री, त्याआधी आई शोभना समर्थ, आजी रत्तनबाई आणि मोठी बहीण नूतन या सिनेक्षेत्रात कार्यरत होत्याच, तसंच त्यांची काकू नलिनी जयवंतही सिने अभिनेत्री होत्या. तनुजा यांना भाषा शिकण्याची खूप आवड होती. त्यांना मोठं झाल्यावर उच्चाधिकारी व्हायचं होतं. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या स्वित्झर्लंड या ठिकाणीही गेल्या होत्या. मात्र कुटुंब आर्थिक अडचणीत आलं आणि त्या अभिनयाकडे वळल्या. ‘हमारी बेटी’ या सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. या सिनेमात त्या बाल कलाकार होत्या आणि त्यांच्यासह काम करणारी अभिनेत्री होती नूतन. छबिली आणि हमारी याद आयेगी या चित्रपटांमध्ये त्या अभिनेत्री म्हणून झळकल्या. त्यानंतर १९६६ मध्ये बहारे फिर भी आयेंगी या सिनेमातही त्या होत्या. हा काळ ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांचा होता. त्यानंतर त्यांनी धमाल केली ती देव आनंद यांच्या ज्वेल थीफ सिनेमात. रात अकेली है, बुझ गये दिये.. आशा भोसलेंचा धुंद करणारा आवाज, तनुजा यांचे विशिष्ट हावभाव आणि आश्वासक हसू या जोरावर गाणं हिट ठरलंच पण सिनेमाही हिट ठरला. आपल्या काळातल्या अभिनेत्रींची सोशिक, धार्मिक, मनमिळाऊ अभिनेत्रींची इमेज ब्रेक करण्याचं सर्वात मोठं काम केलं ते तनुजा यांनी.

Tanuja Birth Day
तनुजा यांचा बोल्ड अंदाज (फोटो सौजन्य – फेसबुक)

इमेज ब्रेक करण्याचं केलं काम

चित्रपटांमध्ये तनुजा येईपर्यंत अभिनेत्रींना कशाप्रकारे पडद्यावर दाखवायचं याची एक पद्धत ठरलेली होती. ती अभिनेत्री साडीत दिसली पाहिजे किंवा व्यवस्थित कपड्यांमध्ये दिसली पाहिजे असा अलिखित नियमच होता असं म्हणता येईल. पण तनुजा यांनी या सगळ्या संकल्पना मोडून काढत बोल्ड आणि बिनधास्त अशी स्वतःची एक इमेज तयार केली आणि लोकांनी त्यावर भरभरून प्रेमही केलं. त्यांनी स्वित्झर्लंड या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषा या भाषांवर प्रभुत्व मिळवलं. १९६० आणि ७० च्या दशकात त्यांनी आपला बोल्ड अवतार सिनेमांमधून समोर आणला. तो काळ हा त्यांच्या अभिनयाचा सुवर्णकाळ होता. कारण वृत्तपत्र, मॅगझीन्स आणि इतर माध्यमांमध्ये त्यांच्याच नावाची चर्चा व्हायची. स्विमसूट घालणं, सिनेमात सिगरेट ओढणं, दारु पिणं या गोष्टी तनुजा यांनी त्यांच्या खास शैलीत दाखवल्या आणि रुजवल्या. ज्या त्या काळात वर्ज्य मानल्या जात होत्या. त्यामुळेच त्या आपली एक इमेज तयार करण्यात आणि ती कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्या.

तनुजा यांचा बबली अंदाज

तनुजा यांना अभिनय करणं हे अगदी सहज वाटायचं कारण त्यांच्या घरातच अभिनयाची परंपरा होती. त्यांना कॅमेरा कसा फेस करायचा हा प्रश्न कधी पडला नाही. बिनधास्त आणि बोल्डपणाबरोबर त्यांनी त्यांचा अवखळ आणि बबली अंदाजही पडद्यावर आणला आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. भूमिका छोटी असो की मोठी त्या आपली बबली छाप पाडण्यात यशस्वी होत. हाथी मेरे साथी, मेरे जीवनसाथी, ज्वेल थीफ या आणि अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ चा. त्यांचे वडील कुमारसेन समर्थ कवी होते आणि आई शोभना समर्थ अभिनेत्री होत्या. तनुजा यांचे आई वडील विभक्त झाल्यानंतर त्यांच्या आईने म्हणजे शोभना समर्थ यांनीच आपल्या मुलीला लाँच करायचा निर्णय घेतला होता. याच बबली तनुजांनी धर्मेंद्र यांना थोबाडीत ठेवून दिली होती.

Tanuja Birth Day
तनुजा या दिसायला खूपच सुंदर होत्या (फोटो सौजन्य-फेसबुक)

अभिनय करण्याच्या बदल्यात मिळायचं लेमोनेड

मी जेव्हा बालकलाकार म्हणून स्वतःचं काम पाहिलं तेव्हा मला ते मुळीच आवडलं नव्हतं. मला आई विचारायची तुला काय हवं ते सांग.. मी म्हणायची मला लेमोनेड प्यायचं आहे. लेमोनेड पिणं हे त्या काळात घरात आवडत नसे. पण आईने तो हट्टही पुरवला असं तनुजा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. छबिली या सिनेमात जेव्हा तनुजा यांनी अभिनय केला तेव्हा त्या १६ वर्षांच्या होत्या. त्याच वेळी त्यांनी बंगाली सिनेमांमध्येही काम केलं. तनुजा यांचा अभिनय पाहून लोक तनुजा यांची तुलना गीता बाली यांच्याशीही करु लागले होते. जीने की राह सिनेमा आला आणि तनुजा प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या कारण त्यांच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या सिनेमात जितेंद्र आणि तनुजा यांची जोडी होती जी लोकांना खूप आवडली. त्यानंतर हाथी मेरे साथीही लोकांनी डोक्यावर घेतला होता. मेरे जीवनसाथी, दो चोर, एक बार मुस्कुरादो हे चित्रपट केले आणि तेपण हिट झाले. बेखुदी, आमीर गरीब अशा हिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.

Tanuja Birth Day
तनुजा यांचा सुंदर फोटो (फोटो सौजन्य-तनुजा फेसबुक पेज)

धर्मेंद्र यांना मारली होती थोबाडीत

चांद और सूरज नावाच्या सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. त्यात धर्मेंद्र आणि तनुजा काम करत होते. तनुजा आणि धर्मेंद्र यांनी त्या सिनेमाआधी इतर काही सिनेमांमध्येही काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. दोघंही शुटिंगला बरोबर जात असत, बाहेर जेवायला जात असत. एकत्र दारुही पित असत. एकदा दारु प्यायल्यानंतर धर्मेंद्र यांनी तनुजाबरोबर फ्लर्ट करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तनुजा यांना धर्मेंद्र यांचं वर्तन मुळीच आवडलं नाही. त्या ताडकन उठल्या आणि त्यांनी धर्मेंद्र यांच्या एक कानशिलात लगावली. मला माहित आहे तुझं लग्न झालंय आणि तुला मुलं आहेत, माझ्याशी फ्लर्ट करायचं नाही. हा प्रसंग घडल्यावर धर्मेंद्र भानावर आले आणि त्यांनी तनुजा यांची माफी मागितली. तनुजा यांनीच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणना झाली नाही

तनुजा त्यांच्या काळातल्या एकाहून सरस चित्रपटांमध्ये काम करत होत्या. मात्र त्या कधीही टॉपच्या अभिनेत्री म्हणून गणल्या गेल्या नाहीत. कधी तनुजाची तुलना मोठी बहीण नूतनशी व्हायची तर कधी त्यांचा टॉम बॉय अंदाज याच्या आड यायचा. मात्र बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे प्रसिद्ध झालेल्या तनुजा यांना तनुजा त्या काळातल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या नाहीत. पारंपरीक अभिनेत्रीची इमेज ब्रेक करण्याची ही अशी किंमत तनुजा यांना मोजावी लागली. टॉपच्या अभिनेत्रींनी नाकारलेले सिनेमा त्यांना ऑफर व्हायचे. काही सिनेमांमध्ये त्यांनी पारंपारीक भूमिकाही करुन पाहिल्या. त्या सिनेमात त्या साडी, मोठं कुंकू हेदेखील वापरलं पण तोपर्यंत त्यांची बोल्ड इमेज लोकांच्या मनात कोरली गेली होती. त्यांनी गुजराती, बंगाली, मराठी सिनेमांतही काम केलं. लोक काय म्हणतील याची त्यांनी अभिनेत्रींपैकी होत्या. तनुजा पार्टीमध्ये सिगरेट किंवा दारु पितानाही दिसत असत. मात्र त्यांची कधीही बदनामी झाली नाही किंवा त्यांच्याविषयी कधी फारसं गॉसिप झालं नाही.

लग्न केलं पण पतीपासून झाल्या वेगळ्या

तनुजा यांचा विवाह १९७३ मध्ये शोमू मुखर्जींबरोबर झाला. या दोघांना दोन मुली झाल्या पहिल्या मुलीचं नाव आहे काजोल आणि दुसरी आहे तनिषा या दोघीही अभिनेत्री आहेत. मात्र शोमू मुखर्जी आणि तनुजा यांचं फार पटलं नाही. या दोघांचा घटस्फोट झाला नाही मात्र ते विभक्त झाले. मुली झाल्यानंतर काही काळ तनुजा यांनी ब्रेक घेतला होता. मात्र पतीपासून विभक्त झाल्यावर त्या पुन्हा चित्रपटांकडे वळल्या. प्रेम रोग, खुद्दार या सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं. साथिया सिनेमात त्यांनी राणी मुखर्जीच्या आईची भूमिका केली होती. ती देखील लोकांना आवडली होती आणि आजही लक्षात आहे. काजोल आपल्या आईपेक्षा दोन पावलं पुढे गेली आहे हे आपल्याला तिचा अभिनय पाहून कळतंच. खाकी सिनेमातल्या त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. एक अभिनेत्री म्हणून त्यांनी आपल्याला रुचेल तसंच काम केलं. त्यांचा बोल्डनेस आणि हॉटनेस त्या ज्या काळात अभिनेत्री झाल्या होत्या तेव्हा त्या काळातल्या प्रेक्षकांना तसा रुचला नाही. पण तरीही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात ध्रुवपद मिळवलं आहे यात शंका नाही.

Story img Loader