कलाविश्वात जर भक्कम स्थान निर्माण करायचं असेल, तर कोणाच्या वरदहस्ताची गरज नसून मेहनत आणि जिद्दीची गरज असते हे अनेक कलाकारांनी दाखवून दिलं आहे. यातलाच एक अभिनेता म्हणजे अशुतोष राणा. अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारून हा अभिनेताल लोकप्रिय झाला. आजही त्याच्या संघर्षमधील लूक आठवला की अनेकांच्या अंगावर काटा येतो. या चित्रपटातील अत्यंत थरारक व तेवढय़ाच भीतीदायक अभिनयामुळे त्याने सर्वाच्याच मनात वेगळीच जागा निर्माण केली. विशेष म्हणजे आशुतोषने घरातील दोन खास व्यक्तींच्या सांगण्यामुळे कलाविश्वात पदार्पण केलं आणि आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक झाला.

मध्यप्रदेशमधील गाडरवाडा येथे जन्मलेला आशुतोष राणा याने आपल्या आजी- आजोबांच्या सांगण्यावरुनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. गावात होणाऱ्या रामलीलामध्ये तो नेहमीच रावणाची भूमिका साकारायचा. यावेळी त्याची भूमिका पाहून त्याच्या आजी-आजोबांना कायम त्याने अभिनय करावा असं वाटायचं. रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारण्यापासून ते अगदी चित्रपटसृष्टीत खलनायकी भूमिकांमध्ये जीव ओतणारा अभिनेता म्हणून आशुतोष ओळखला जातो.

आणखी वाचा- चौकटीला छेद! ‘या’ अभिनेत्यांनी दिला तृतीयपंथीयांच्या भूमिकेला न्याय

दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्याने अभिनयाचे रितसर शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्याने अभिनेता म्हणून आपली वाटचाल करण्यास सुरुवात केली. ‘स्वाभिमान’ मालिकेपासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. आशुतोष राणाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती म्हणजे १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुश्मन’ या चित्रपटामुळे. या चित्रपटासाठी त्याला ‘फिल्मफेअर’ आणि ‘स्क्रीन वीकली’चा सर्वोत्कृष्ट खलनायकचा पुरस्कार मिळाला होता.

हिंदी सोबतच विविधभाषी चित्रपटांमध्येही त्याने उल्लेखनीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याने आतापर्यंत हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड,मल्याळम, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. अभिनयाचा भक्कम पाया असणाऱ्या आशुतोषला वाचनाचीही फार आवड आहे. विविध प्रकारचे साहित्य वाचण्याकडे त्याचा कल असतो.

Story img Loader