गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयांवरील मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून मराठी प्रेक्षकांकडूनही त्यांचे स्वागत होत आहे. आगामी ‘बायोस्कोप’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने असाच एक आगळावेगळा योग जुळून आला आहे. मराठीतील तीन कवींच्या कविता आणि मिर्झा गालीब यांचा एक शेर यावर हा चित्रपट आधारित आहे. या एकाच चित्रपटात प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे चार लघुचित्रपट पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे मराठीतील चार नामवंत दिग्दर्शकांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली आहे. चित्रपटासाठी चार वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी काम केले असून कवी-गीतकार संदीप खरे ‘बायोस्कोप’मध्ये एका लघुचित्रपटात चक्क अभिनेता म्हणून दिसणार आहे.
मराठीतील विजू माने, गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते या दिग्दर्शकांसह आजचा आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव असे चार जण ‘बायोस्कोप’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हे चार जण आणि ‘गोल्डन ट्री लिमिटेड’ निर्मिती संस्था यांनी संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे. अविनाश-विश्वजित, डॉ. सलील कुलकर्णी, नरेंद्र भिडे, चिनार-महेश या चार संगीतकारांची वेगवेगळी शैलीही चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.
रवी जाधव यांचा चित्रपट कृष्णधवल
रवी जाधव दिग्दर्शित करत असलेला चित्रपट कवी-गीतकार संदीप खरे याच्या ‘उदासीत या कोणता रंग आहे’ या कवितेवर आधारित असून चित्रपटाचे नाव ‘मित्रा’ असे आहे. रवी जाधव यांचा हा लघुचित्रपट संपूर्णपणे कृष्णधवल रंगात आहे. खरेतर रवी जाधव यांना ‘बालगंधर्व’ हा चित्रपट कृष्णधवल रंगात करायचा होता, पण तेव्हा जे जमले नाही. तो प्रयोग या चित्रपटाच्या निमित्ताने ते करत आहेत. अनेक वर्षांनी रसिकांना पुन्हा एकदा कृष्णधवल रंगातील चित्रपट पाहायचा एक वेगळा अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार आहे.
विजू माने दिग्दर्शित करत असलेला चित्रपट अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांच्या ‘एखाद्या पावसाळी दुपारी’ या कवितेवर आधारित आहे. या चित्रपटाचे नाव ‘एक होता काऊ’ असे आहे. तर लोकनाथ यशवंत यांच्या ‘दुष्काळ’ या कवितेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करत असून चित्रपटाचे नाव ‘बैल’ असे आहे. गजेंद्र अहिरे यांचा चित्रपट मिर्झा गालीब यांच्या उर्दू शेरवर असून त्याचे नाव ‘दिले नादान’ असे आहे. तीन कविता आणि एक उर्दू शेर यावर आधारित असलेला हा ‘बायोस्कोप’ मराठीत खरोखरच वेगळा प्रयोग ठरणार आहे. कारण चार वेगवेगळे संगीतकार आणि चार वेगवेगळ्या कवींच्या कविता यावर हा चित्रपट आहे. ‘बायोस्कोप’मध्ये या सर्व कवितांवर हे चारही लघुचित्रपट सहजतेने गुंफण्यात आले आहेत.
कवी-गीतकार संदीप खरे एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. संदीप खरे यांची ही नवी भूमिका अभिनेत्याची आहे. संदीप खरे यांचे ‘आयुष्यावर बोलू काही’ आणि अन्य कार्यक्रम रवी जाधव यांनी पाहिले होते. यापूर्वी एकांकिका/नाटक यांतून काम करण्याचा अनुभव खरे यांच्या पाठीशी होता. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार आणि भूमिका यांची चर्चा सुरू असताना रवी जाधव यांना त्यांच्या चित्रपटासाठी संदीप खरे यांचे नाव अभिनेता म्हणून योग्य वाटले. संदीप खरे यांची निवड करून अभिनेता म्हणून काम करण्याची संधी त्यांना दिली.
नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर, मृण्मयी देशपांडे, वीणा जामकर, मंगेश देसाई, स्मिता तांबे, कुशल बद्रिके, स्पृहा जोशी आदी कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता अन्य तांत्रिक सोपस्कार आणि काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण झाले की चित्रपट रसिकांना पाहायला मिळेल. मात्र चित्रपटाचे प्रोमोज लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा