कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवरचे चित्रपट हे बॉलिवूडला नवीन नाहीत. गेल्या वर्षभरात ‘डी डे’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ हे दाऊदवरचे दोन चित्रपट येऊन गेलेत. आणि तरीही अजून एक चित्रपट दाऊदवर येऊ घातला आहे. पण, यावेळच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे दाऊदवरच्या या चित्रपटाची सहनिर्मिती ही एका कुत्र्याची असणार आहे. ही कुत्रीही साधीसुधी नाही तर लॅब्रेडॉर जातीची आणि फिल्मी कुटुंबात वाढलेली एक कुत्री या चित्रपटाची सहनिर्माती म्हणून मिरवणार आहे.
हिंदी चित्रपट निर्माता सुनील बोहरा दाऊदवर एका चित्रपटाची निर्मिती करणार असून पहिल्यांदाच दिग्दर्शनही करणार आहे. त्याने या चित्रपटाच्या निर्मितीत आपल्या नावाबरोबर आपल्या लाडक्या कुत्रीचे नावही सहनिर्माता म्हणून दाखल करून घेतले आहे. ‘झोरा’ ही आमच्या घरातील एक महत्त्वाची सदस्य आहे. ती तीस दिवसांची होती तेव्हा माझा मित्र दिग्दर्शक मुदस्सीर अजीज याने ती आम्हाला भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून तिचे माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. ती माझ्यासाठी भाग्यदायक आहे, हा माझा विश्वास आहे. म्हणून या चित्रपटाच्या निर्मितीत आणि दिग्दर्शनाच्या पहिलेपणातही तिचं नशीब माझ्याबरोबर असावे, असे वाटत असल्यानेच तिचे नाव सहनिर्माती म्हणून नोंद केल्याचे सुनील बोहरा यांनी म्हटले आहे.
सुनील बोहरांची निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे दाऊदवर केलेला गंमतीदार चित्रपट असणार आहे. दाऊदला भेटण्याची आस असलेला एक भारतीय तरूण त्याला शोधत शोधत पाकिस्तानात येऊन पोहोचतो आणि मग त्याला दाऊद भेटतो का?, काय होते?, अशा गंमतीदार वळणांची ही कथा आहे. भारतीय तरुणाच्या भूमिकेसाठी बोहरा यांनी ‘कसम से’ चित्रपटातील पवन शंकर या अभिनेत्याची निवड केली आहे. मात्र, बोहरा आणि त्यांची निर्माती झोरा यांना अजून त्यांच्या चित्रपटातला दाऊद सापडलेला नाही. सध्यातरी ही निर्माता-दिग्दर्शकांची जोडगोळी दाऊदच्या शोधात फिरत असल्याचे समजते. बोहरांची झोरा त्यांच्या घरातल्यांचीही लाडकी असल्याने निर्माती म्हणून तिचे नाव असण्याला त्यांची कुणाचीच हरकत नाही आहे.

Story img Loader