माहिती-तंत्रज्ञान, संगणक आणि मोबाइलच्या सध्याच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉग यालाही विशेष महत्त्व आले आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेते व अभिनेत्री आपला नवा चित्रपट, त्यातील भूमिका किंवा ‘लूक’बाबतची माहिती, छायाचित्रे सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी प्रसारित करत असतात. संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी हिंदी चित्रपटाची चर्चा सध्या सुरू असून सोशल मीडियावरून ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील पहिली छायाचित्रे फिरत आहेत. चित्रपटातील ‘बाजीराव’ अर्थात रणवीर सिंग, ‘मस्तानी’ (दीपिका पदुकोण)आणि ‘काशीबाई’ (प्रियांका चोप्रा) या कलाकारांची त्या भूमिकेतील छायाचित्रे प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहेत.
मराठी इतिहासातील बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकथा संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटातून मांडण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपटाची झलक (ट्रेलर) आणि त्याचे पोस्टर नुकतेच एका कार्यक्रमात प्रदर्शित झाले. याबाबतची माहिती स्वत: प्रियांकाने ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साइटवरून जाहीर केली आहे. ‘बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है, अय्याशी नही’ या रणवीरच्या आवाजातील वाक्याने ट्रेलरची सांगता करण्यात आली आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि इतिहासातील प्रेमकथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा त्यांच्या आजवरच्या बॉलीवूडमधील भूमिकांपेक्षा एकदम वेगळ्या ‘लूक’मध्ये आणि भूमिकेत त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. मात्र, रणवीरला ‘बाजीराव’च्या रूपात पाहून या ‘बाजीराव’पेक्षा यापूर्वी मराठीत मनोज जोशी आणि अंगद म्हसकर या अभिनेत्यांनी साकारलेल्या ‘बाजीराव’ची आठवण मराठी प्रेक्षकांना होते आहे.

Story img Loader