देशात भारतीय जनता पक्षाचे(भाजप) सरकार आल्याने आनंद झाल्याचे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केले आहे. तसेच भाजप म्हणजे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे असल्याचेही सोनाक्षी म्हणाली.
सोनाक्षी म्हणाली की, “देशात भाजपची सत्ता आल्याने आनंदी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच प्रशासनात बदल घडवून दाखविले आहेत तसेच युवांचा मोदींप्रतीचा उत्साह उल्लेखनीय आहे. ही चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत.”
मोदींच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांचा समावेश असल्याबद्दलही सोनाक्षीने आनंद व्यक्त केला. परंतु, स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरील वादावर बोलण्यास सोनाक्षीने टाळले.
सोनाक्षीचे वडिल शत्रूघ्न सिन्हा देखील भाजपचे खासदार आहेत. त्यांनी यावेळीच्या लोकसभा निवडणूकीत पटणा साहिब मतदार संघातून प्रचंड मतांनी विजय प्राप्त केला. तसेच घरात राजकारण आणि बॉलीवूडबद्दलच्या गोष्टी क्वचित प्रसंगी होत असल्याचेही सोनाक्षीने स्पष्ट केले.
आमच्या घरी बॉलीवूड आणि राजकारण या गोष्टींचा संवाद भरपूर होत असेल असे सर्वांना वाटते परंतु, तसे काहीच नाही. दिवसभरात काय केले, कोणाला भेटलो, दिवस कसा होता असे अगदी सर्वसाधारण स्वरूपाचे संभाषण आमच्यामध्ये होत असल्याचे ती म्हणाली.