बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. अनेक दिवसांपासून विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल चर्चा होती आणि अखेर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. देशभरातील सेलिब्रिटींनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर आता एका भाजपा नेत्यानेही कतरिना कैफचे कौतुक करत फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

हरियाणा भाजपाचे आयटी विभागाचे प्रमुख अरुण यादव यांनी कतरिनाचा लग्नानंतरचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती भांगेत कुंकू लावून हात जोडलेली दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत त्यांनी, “गळ्यात मंगळसूत्र, भांगेत सिंदूर, मंद हास्य. खिल्ली उडवण्यापेक्षा इतिहास विसरून तिचे स्वागत करा कारण ती तैमूर किंवा औरंगजेबची आई होणार नाही,” असे म्हटले आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही चर्चेत आहेत. कतरिना आणि विकीचे चाहतेही त्यांच्या फोटोंचे कौतुक करत आहेत. या जोडप्याने अनेक स्टिरियोटाइप मोडून एक आदर्श ठेवल्याने हे लग्न खास असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत हे लग्न इतर सेलिब्रिटींच्या लग्नापेक्षा जास्त खास असल्याचे बोलले जात आहे. विकीचे वय ३३ वर्षे आणि कतरिनाचे वय ३८ वर्षे आहे.

दरम्यान, सैफ करीनाचा पहिला मुलगा तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरुन मोठा वाद झाला होता. मुलाचं नावं तैमूर ठेवल्यामुळे सैफ करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूरचं नाव सैफनं मुलाला दिलं असं म्हणत नेटीझन्स चांगलेच संतापले होते.

खूप जणांनी तेव्हा आम्हाला ट्रोल केलं, मात्र तितक्याच लोकांनी आमचं समर्थनही केलं होतं अशी प्रतिक्रिया करीनाने दिली होती. तर तैमूर म्हणजे लोह आणि हा एक पर्शियन शब्द आहे. लोकांच्या प्रतिक्रिया या अतिशय तीव्र होत्या कारण दिलेलं नाव हे एका निर्दयी सम्राटाचं होतं. तो तीमूर होता जो एक मोगल सम्राट होता. आणि माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. जे कोणत्याही सम्राटाच्या नावाशी संबधित नाही. मला हे नाव आवडलं इतकचं पुरे आहे,” असं सैफने म्हटले होते.