उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे फॅशन सेन्स आणि ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फीच्या या चित्रविचित्र फॅशनमुळे आता ती अडचणीत आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतंच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चित्र विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्रही दिलं आहे. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे.

चित्रा वाघ यांनी दिलेल्या पत्रात नेमकं काय?

“उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.

मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे”, असे चित्रा वाघ यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. पोलीस आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये मुंबई पोलिस आणि भाजप या दोन्हीला टॅगही केले आहे.

हेही वाचा – चित्रा वाघ यांनी अटकेची मागणी केलेल्या उर्फी जावेदची संपत्ती कोट्यावधींच्या घरात, दर महिन्याला कमावते ‘इतके’

दरम्यान चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी याबद्दल एक ट्वीट करत संतापही व्यक्त केला होता. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे. “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले होते. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांनी पत्र दिलं आहे. आता उर्फी जावेदवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh demand arrest urfi javed for her topless look letter to mumbai police commissioner nrp
Show comments