सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उर्फी जावदेच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केल्यामुळे या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी या प्रकरणात उडी घेत यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. चित्रा वाघ यांनी यावर भाष्य केलं आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत चित्रा वाघ म्हणाल्या, “उर्फी जावेद या व्यक्तीला किंवा तिच्या धर्माला विरोध नाही. तिच्या विकृतीला माझा विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला एक गरीमा, संस्कृती आहे. उर्फीच्या स्वैराचाराला समर्थन देणाऱ्या लेकी ज्या सावित्राबाई फुलेंनी आम्हाला सुशिक्षित व सक्षम केलं त्यांना अभिप्रेत असतील का? हा राजकारणाचा विषय नाही, समाजस्वास्थाचा आहे, असं मी सुरुवातीपासूनच म्हणत आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊ या, असं मी म्हणाले. पण नेहमीप्रमाणे यातही राजकारण केलं गेलं”.
हेही वाचा>> “तिला तुरुंगात…”, उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांचं विधान
“चित्रा वाघ हे प्रसिद्धीसाठी करत आहेत. उर्फी मुस्लीम धर्मीय आहे, म्हणून हे तिच्याविरोधात हे सुरू आहे, असंही बोललं गेलं. या सगळ्यांच्या विचारांची मला कीव येते. कारण, जगातील कोणताच धर्म बाईला तू नग्नावस्थेत नाच, आम्ही तुझं समर्थन करू, असं सांगत नाही. त्यामुळे या उर्फी प्रकरणात जबरदस्तीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते चुकीचं आहे”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा>> “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल
नेमका वाद काय?
मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन”, असं विधानही त्यांनी केलं होतं. त्यानंतर उर्फीने नंगानाच सुरुच राहणार असं म्हणत त्यांना प्रत्युतर दिलं होतं. उर्फी व चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युदध सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. त्यानंतर उर्फीने शनिवारी (१४ जानेवारीला) तिचा जबाब नोंदवला आहे.