सध्या ‘पॅन इंडिया’ चित्रपटांची चांगलीच चलती आहे. कोविड काळात आलेल्या ‘पुष्पा’पासून ते नुकत्याच आलेल्या ‘कांतारा’पर्यंत कित्येक चित्रपट हे पॅन इंडिया लेवलचे होते. या सगळ्याच चित्रपटांनी बक्कळ पैसा कामावला, काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटलेदेखील, पण बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दाक्षिणात्य चित्रपटापाठोपाठ मराठीतही हा प्रयोग सुरू झाला आणि ‘हर हर महादेव’सारखा पहिला मराठी चित्रपट वेगवेगळ्या भाषेत डब होऊन प्रदर्शित झाला. आता दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटापाठोपाठ आता भोजपुरी चित्रपटही कात टाकतोय. आता भोजपुरी चित्रपटही ‘पॅन इंडिया लेवल’वर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील स्टार आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी ही घोषणा केली आहे.

आणखी वाचा : ‘दिल्ली फाइल्स’आधी विवेक अग्निहोत्री हाताळणार ‘हा’ विषय; नाना पाटेकर, पल्लवी जोशी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

रवी किशन यांनी नुकतंच त्यांच्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘महादेव का गोरखपुर’. हा चित्रपट पहिला भोजपुरी पॅन इंडिया चित्रपट असल्याचं या पोस्टरवर नमूद केलं आहे. सोशल मीडियावर या पोस्टरची चांगलीच चर्चा आहे. भोजपुरीसह हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राजेश मोहनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून रवी किशन हे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

चित्रपटाचं शूटिंग गोरखपुरमध्ये सुरू झालं आहे. रवी किशन यांनी वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटात काम करून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात हिंदी चित्रपटापासून केली होती. त्यानंतर तामीळ आणि मग भोजपुरी चित्रपटात रवी यांनी नशीब आजमावलं. इतकंच नाही तर रवी किशन आता ओटीटीवरही झळकणार आहेत. नेटफ्लिक्सच्या ‘खाकी – द बिहार चॅप्टर’ या नव्या वेबसीरिजमध्ये रवी किशन महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp member of parliament and actor ravi kishan presents the first pan india bhojpuri film avn
Show comments