BJP MP Tejasvi Surya Sivasri Skandaprasad Wedding : भारतीय जनता पार्टीचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले आहेत. तेजस्वी सूर्या यांनी लोकप्रिय गायिका शिवश्री स्कंदप्रसादशी आज (६ मार्च) लग्न केलं. तेजस्वी व शिवश्री यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. तेजस्वी हे दक्षिण बेंगळुरूचे खासदार आणि बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. तर शिवश्री ही लोकप्रिय गायिका व भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
तेजस्वी सूर्या व शिवश्री यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच पाहुणे उपस्थित होते. तेजस्वी यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर तेजस्वी व शिवश्री यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या. भाजपा नेते अन्नामलाई, प्रताप सिन्हा, अर्जुन मेघवाल आणि अमित मालवीय यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
या जोडप्याने त्यांच्या लग्नात पारंपरिक पोशाख परिधान केला होता. शिवश्री स्कंदप्रसादने पिवळी कांचीपुरम सिल्क साडी नेसली होती. तसेच सोन्याच्या बांगड्या आणि कानातले घालून लूक पूर्ण केला होता. तर, तेजस्वी सूर्या यांनी पांढरे धोतर व जॅकेट घातले होते.
कोण आहे शिवश्री स्कंदप्रकसाद?
शिवश्री स्कंदप्रसादने बायोइंजिनियरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे. शिवश्रीला संगीतक्षेत्रात खूप रस आहे. तिने आतापर्यंत देशभरातील अनके प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये खासकरून चेन्नईमध्ये सादरीकरण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या कन्नड भक्ती गीत ‘पूजीसलेंडे हुगला थंडे’चं कौतुक केलं होतं. सध्या शिवश्रीचे युट्यूबवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहे. तिने कन्नड भाषेतील ‘पोन्नियिन सेल्वन: भाग 2’ मधील ‘वीरा राजा वीरा’ गाणं गायलं होतं. हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं.