माव्‍‌र्हलच्या डेडपूल, व्हिजन, नोव्हा, स्पीड, लुना यांसारख्या दुसऱ्या फळीतील नवीन सुपरहिरोंच्या फौजेत नवीनच भरती झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ने ऑस्करमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मार्व्हल स्टुडिओसाठी ऑस्कर जिंकणारा ‘ब्लॅक पँथर’हा पहिलाच आफ्रिकन सुपरहिरो ठरला आहे.

‘रोमा’ आणि ‘बोहेमियन ऱ्हाप्सडी’नंतर सर्वाधिक नामांकनं ही ‘ब्लॅक पँथर’ला मिळाली होती. सात नामांकनं या चित्रपटाला मिळाली यातल्या तीन पुस्करांवर ‘ब्लॅक पँथर’नं आपली मोहोर उमटवली आहे. ‘ब्लॅक पँथर’हा मार्व्हल स्टुडिओचा पहिला आफ्रिकन सुपरहिरो आहे. जगभरातील ९०टक्क्यांपेक्षा जास्त समीक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन, ओरिजनल स्कोअर या तिन्ही प्रकारात ‘ब्लॅक पँथर’नं पुरस्कार पटकावला आहे.

तब्बल ११ वर्षांनंतर एका सुपरहिरोपटानं ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. मार्व्हलला पहिला ऑस्कर मिळवून दिणारा ब्लँक पँथर हा स्टुडिओसाठी हुकमी एक्का ठरला आहे. भारतात १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘ब्लॅक पँथर’ हा आजवरचा सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिरोपट ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवडय़ात जगभरातून तब्बल १३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली तर भारतात ३० कोटींचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश आलं होतं. याआधी द अ‍ॅव्हेंजर्स, थॉर राग्नारोक, डेडपूल या सुपरहिरोपटांनी पहिल्या आठवडय़ात १००० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कमाईचा विक्रम केला होता. पण ब्लॅक पँथरनं मात्र मार्व्हलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Story img Loader