हिंदी (खूपच अलीकडे मराठीही) चित्रपटसृष्टीबाबत काही खास फंडे लोकप्रिय आहेत. ते कधीपासून आहेत, का आहेत वगैरे वगैरे ‘क’कारी प्रश्न केलेत/ न केलेत तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. फिल्मवाल्यांची काय हो रोजच दिवाळी, ते कशाला उगाच दिवाळी येण्याची वाट पाहताहेत हा देखील असाच एक फंडा (की गैरसमज?) सत्तरच्या दशकात तो रुजला आणि मग तो प्रचलित झाला. या समजाला खुद्द चित्रपटसृष्टी जबाबदार आहे की पाहणार्यांचा दृष्टिकोन हा प्रश्न देखील पूर्णपणे कालबाह्य झालाय. चित्रपट माध्यम म्हणजे अनेक प्रकारच्या लहान मोठ्या कला व विज्ञान याचे मिश्रण व त्याला पैसा, मेहनत व आशावाद याची जोड ही कृष्ण-धवल चित्रपटाच्या काळातील ठळक व्याख्या व वस्तुस्थिती. आज ते सगळेच भाबडेपण व स्वप्नाळूपण वाटेल. पण काळ बदलत राहिला, चित्रपट ‘रंगात’ आलाय, कलाकारांच्या अभिनय बांधिलकी व निष्ठा यापेक्षा त्यांचा ‘रंगेल’पणा, उंची जीवनशैली, अफेअर्स, नवीन गाडी, बंगला, घर, खाण्यापिण्याची हौस मौज यांना महत्त्व येत गेले आणि फिल्मवाल्यांची तर रोजच दिवाळी असा समज अधोरेखित होत राहिला. हे एवढ्यावरच थांबले नाही. एखाद्या चित्रपटात दिग्दर्शकाने कसे विचारपूर्वक एखादे दृश्य चित्रीत केले. त्या दृश्याचे पटकथेत काय स्थान होते, कलाकारांना ते कसे समजावून सांगितले, त्यात क्लोजअपची आवश्यकता का भासली, अशी एखाद्या चित्रपटाची (उदाहरणार्थ बिमल रॉय, गुरुदत्त, विजय आनंद, चेतन आनंद यांचे काही चित्रपट) खोलवर समीक्षा मागे पडून फिल्मी पार्ट्यांची गुलाबी/ बदामी/ रोचक/ रंजक वर्णने वाढू लागली. स्टार्सचे ब्रेक-अप, विवाहपूर्व बाह्यसंबंध, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, घटस्फोट, विवाहबाह्यसंबंध, लिव्ह इन, सेकंड मॅरेज याची कालांतराने जरा जास्तच चर्चा होऊ लागल्याने तर चित्रपटसृष्टी म्हणजे असेच काही भलतेच असा समज रुजला. प्रसार माध्यमातून हे असेच काही भडक व वाह्यात द्यावे, त्यालाच वाचक (आता लाईक्स, कमेन्टस) आहेत असे मानण्याची प्रवृत्ती रुळली. हे सगळेच कमी म्हणून की काय चित्रपटाचे वाढते बजेट व पहिल्याच शोपासून ‘गल्ला पेटी’वरील उत्पन्नाचे आकडे यातून चित्रपट गुणवत्तेमुळेच ओळखला व आवडला जातो या प्राथमिक गोष्टीकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले. काही वर्षांपूर्वीपर्यंत कित्येक चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे अर्धा दिवस चालणारा जंगी सोहळाच असे. आजही मेहबूब स्टुडिओतील ‘मजनून’ चित्रपटाचा अतिशय लॅव्हिश मुहूर्त आठवतोय. वांद्रा स्टेशनला पश्चिमेकडे उतरताच ‘हा रस्ता मजनूनच्या मुहूर्ताला जातो’ असा फलक आणि तेथून तीन किलोमीटरवर ‘मजनून’ची प्रचंड जाहिरातबाजी. या चित्रपटाचा निर्माता राजेश खन्ना असल्याने त्याच्या ‘सुपर स्टारडम’ पोझिशनला साजेसेच हे होते हे मान्य. पण इतके? त्या दिवशी दिवाळी नव्हती, तर त्याचा वाढदिवस होता (३० डिसेंबर) पण सगळाच थाटमाट अविस्मरणीय व दिवाळीसारखाच. कमाल अमरोही यानी राजेश खन्ना व राखी गुलजार यांच्यावर उर्दूचा भरपूर वापर असणारा शेरोशायरीमय संवाद मुहूर्त दृश्यात ठेवून वातावरणात आणखीनच रंग आणला. (यू-ट्यूबवर हे दृश्य उपलब्ध आहे) मुहूर्त दृश्य होताच खाण्यापिण्याची मनसोक्त चंगळ. सुभाष घईच्याही ‘कर्मा’चा मुहूर्त असाच जंगी झाला. योगायोगाने त्या दिवशी दिवाळीच होती. मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत विविध स्तरावर येथे दिवाळीचाच फिल गुड असतो. पडद्यावरच्या जगापेक्षाही पडद्याबाहेरचे जगच जास्त प्रमाणात आपले अस्तित्व व महत्त्व दाखवू लागल्याने तर सतत दिवाळीच असते असे कोणी म्हणालेच तर त्यात चूक ते काय? तात्पर्य चित्रपटसृष्टीत रोजच दिवाळी असते असे म्हणणे स्वाभाविक व सवयीचे ठरले.
वाढत्या चित्रपट निर्मितीसह येथील दिवाळी वातावरण छानच रुजले. उपग्रह वाहिन्या व त्यावरच्या भरजरी झगमगाटी मालिका, देखण्या भव्य सेटवरचे गेम शो- रियॅलिटी शो, त्याच्या खर्चाचे व नंतर टीआरपीचे आकडे, देश-विदेशातील ग्लॅमरस इव्हेंट्स, जगभरात दूरवर होऊ लागलेली दिलखुलास/ दिलखेचक फोटोसेशन्स, या सार्यातून स्टारची जीवनशैली उंचावतानाच त्यांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून मागणी, काही लाखातील ‘सुपारी’चे सातत्य. फिल्मवाल्यांची रोजच दिवाळी असते हो असे कधीतरी एखादा चित्रपट पाहणाराही सहज बोलून जाईल, असेच हे वातावरण निर्माण झालंय ना? याचा अर्थ कसदार/आशययुक्त चित्रपट निर्माण होतच नाहीत असंही नाही. याच दिवाळीमय वातावरणातच ‘न्यूटन’, ‘शुभमंगल सावधान’, ‘मद्रास कॅफे’, ‘नीरजा’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, बनतात. मराठीतही ‘नदी वाहते’, ‘कासव’, ‘बापजन्म’, ‘रिंगण’ बनतात. पण झगमगाटी बहुचर्चित ‘पद्मावती’ येतो आणि पुन्हा दिवाळीमय वातावरण निर्माण होते. त्याची भरजरीत पोस्टर्स म्हणजे दिवाळीची रोषणाई, आकाश कंदील, भव्य रांगोळीच जणू. दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने ‘देवदास’पासूनच आपला चित्रपट म्हणजे पडद्यावरची दिवाळीच असे ‘चित्र’ आकाराला आणले व ‘बाजीराव मस्तानी’ने ते कमालीचे गडद केले. खान हिरोंच्या प्रत्येक चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी ते फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणजे जणू दिवाळीमय वातावरणच तर असते. हे सगळेच होत असतानाच भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मामी फेस्टिवल, एशियन फिल्म फेस्टिवल यापासून ते राज्य व केंद्र सरकारकडून देण्यात येणारे पुरस्कार , जगभराचा चित्रपट महोत्सव, ऑस्कर पुरस्कार हे सगळेच सुरु असते. पण ते एक तर तेवढ्यापुरते राहते अथवा त्या त्या वेळीही दिवाळीमय वातावरण निर्माण होते. कदाचित ते एकूणच सवयीतून होत असावे. मधूनच एखादी एखादा खूपच मागच्या पिढीचा कलाकार कुठेतरी दुर्लक्षित वा हलाखीचे जीवन जगतोय याची ‘ब्रेकिंग न्यूज’ येते, थोडीफार सहानुभूती निर्माण होते पण तेवढ्यात कंगना राणावतने ह्रतिक रोशनवर केलेल्या बेधडक आरोपाची बातमी येते अथवा प्रियांका चोप्राच्या हॉट लूकचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची हॉट न्यूज येते आणि ती दु:खाची बातमी बाजूला पडते. एखाद्या वेळेस अपवाद ठरतो. पण ताजे व गरम अन्न तब्येतीला उत्तम हा मंत्र चित्रपटसृष्टीने नकळत अंगिकारला असल्याने सतत कसले तरी फटाके फुटतात. (एखादा मुद्दा गाजतो. सलमान, आमिरचा गाजल्याची तुम्हाला आठवण असेलच), सौंदर्याची रांगोळी पसरते, (पद्मावतीची दीपिका पादुकोण) देखणी- खर्चिक रोषणाई (ते मोठे सेट व पार्टीतील ग्लॅमरमध्ये असतेच), चविष्ट फराळाची मेजवानीच मिळते (अमिताभ बच्चनकडून ती विविध स्तरावर मिळत असते). आकर्षक आकाश कंदील/ चांदणी लक्ष वेधते (हिंदी तर झालेच पण मराठीतील अभिनेत्रींही खूपच चांगल्या स्टाईल व अॅप्रोचनने आपले ग्लॅमरस रुपडे खुलवतात हे सातत्याने दिसू लागलंय), शुभेच्छांचा वर्षाव (हे तर चित्रपटसृष्टीचे खूपच जुने वैशिष्ट्य. मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत येथे अखंडपणे पुरवठा होणारी गोष्ट म्हणजे शुभेच्छा. त्या तद्दन फिल्मी असतात हो असे कोकलून काहीही उपयोग नाही. आता तर सोशल नेटवर्किंग मीडियाने २४ तासांत शुभेच्छांची देव घेव खूपच सोपी केलीये)
प्रचंड एनर्जी म्हणजे आपली चित्रपटसृष्टी. दिवाळीचा कायमस्वरूपी फिल त्याला नॉनस्टॉप टॉनिक देतो. येथे रोजच हॅपी दिवाली! पेज थ्री पार्ट्यांपासून ते आपले आवडते पर्यटनस्थळ, नवीन मोबाईल, गाडी यावरच्या झक्कास मुलाखती असे येथे छान दिवाळीमय वातावरण आहे. फिल्मवाल्यांची रोजच दिवाळी असली तरी आपली मात्र वर्षातून एकदाच येते. त्या दिवाळीच्या शुभेच्छा!
दिलीप ठाकूर