रिमा मूळची पुण्याची. पण मुंबईत ती गिरगावात आंबेवाडीत राहायची. तेव्हाची ती नयन विष्णू भडभडे. बालकलाकार ते चरित्र नायिका अशी खूपच मोठी वाटचाल करुनही रिमा कधीच गिरगावाला विसरली नाही. याचा प्रत्यय दोनच वर्षांपूर्वी याच गिरगावातील टोपीवाला व्याख्यानमालेत तिची जाहीर मुलाखत घेताना आला. साधारणपणे १९८५ च्या आसपास रिमा गिरगाव सोडून अंधेरीत राहायला गेली. तोपर्यंत ती अभिनयाच्या क्षेत्रात नावारूपास येत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या या चौफेर वाटचालीनंतरही तिची गिरगावची ओढ व आठवण कायम असल्याचा छानसा प्रत्यय आला. खूप वर्षांनी गिरगावात आल्याने कसे वाटले, काय भावना आहेत, असा पहिलाच प्रश्न मी करताच तिने श्रोत्यांवर एक नजर टाकत म्हटलं की इथं बाहेर जे बसस्टॉप आहेत तिथं बससाठी रांग लावण्यापासूनच्या माझ्या खूपच आठवणी आहेत. समोरच मॅजेस्टिक चित्रपटगृहात किती तरी मराठी चित्रपट मी पाहिलेत. याच गिरगावातील साहित्य संघ मंदिरात मी अनेक नाटकं पाहिलीत. आणि कालांतराने तिथंच नाट्यप्रयोगही केले. गिरगावातील चाळ संस्कृती, तेथील माणुसकी व चांगुलपणाचा अनुभव घेतलाय. महत्त्वाचे म्हणजे सर्वानी मिळून मिसळून सण साजरे करण्याची पद्धत. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, रंगपंचमी सगळं काही चांगलंच आठवणीत आहे. त्यावेळी गिरगावपासून जास्त लांब जायला आईची परवानगी नसे. तरी मी ग्रँटरोडला सुपर चित्रपटगृहात अवघ्या एक रुपयात कोणता तरी चित्रपट पाहायला भावाबरोबर गेले हे आईला कळल्यावर आईने केलेली शिक्षा आजही मला लक्षात आहे. गिरगावातील त्या आठवणी मी कधीच विसरणार नाही. विरकर हॉटेलपासून कुलकर्ण्यांच्या भजीपर्यंत कोणतीच गोष्ट मुळचा गिरगावकर जगात कुठेही गेला तरी विसरणे शक्यच नाहीत. मला संपूर्ण कारकिर्दीत गिरगावने दिलेले संस्कार व सभ्यता कायम उपयोगात आली. रिमा अगदी मनापासून भरभरून बोलली व ही जाहीर मुलाखत खूपच रंगली.

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

गेल्याच महिन्यात पुन्हा एकदा रिमाचे गिरगावात येणे झाले. स्थानिक शिवसेना शाखेने ‘कट्टर गिरगावकर’ या पुरस्काराने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गौरवले. तेव्हा रिमा येणे स्वाभाविक होतेच. या निमित्ताने पुन्हा रिमाची भेट झाली. योगायोगाने रिमाचा हा शेवटचा पुरस्कार ठरलाय.

VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले सीन

मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत विविध कारणास्तव रिमाची नेहमीच भेट होई. राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’पासून (१९८४) आमच्या अगणित भेटी झाल्यात. आपलं नवीन काय चाललंय हे अगदी उत्साहात सांगतानाच पटकन एखाद्या जुन्या आठवणीत रमणे हे तिचे विशेष होते. ‘मैने प्यार किया’पासून (१९८८) रिमाने हिंदी चित्रपटातील ग्लॅमरस आई ही प्रतिमा रुजवली. त्याच रिमाने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’मध्ये (१९९९) आपल्या गॅगस्टर पुत्रावर (संजय दत्त) गोळी चालवणाऱ्या करारी आईचीही भूमिका साकारली. रिमाची अष्टपैलू वाटचाल खूपच मोठी व वैशिष्ट्यपूर्ण. आता फक्त त्याच्या आठवणीच राहिल्यात… नाटक, चित्रपट व मालिकांसह तिने सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी जपली होती. मराठी व हिंदीसह गुजराती रंगभूमीवरदेखील भूमिका साकारल्या होत्या. कन्नड व भोजपुरी चित्रपटातूनही भूमिका केल्यात. हिंदी चित्रपटसृष्टीत कुठेही भेटली तरी आवर्जून मराठीतच बोलणार हेदेखील तिचे विशेष होतं!

– दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by dilip thakur on reema lagoo nostalgic girgaon