शशी या शब्दाचा अर्थ चंद्र असाही होतो. अभिनय क्षेत्रातला चंद्र म्हणून कोणा अभिनेत्याचे नाव घ्यायचे असेल तर ते शशी कपूर यांचे घेतले पाहिजे. अभिनेता, निर्माता अशा भूमिका लिलया पेलत हा हरहुन्नरी कलाकार कायम सिनेमा व्यापत राहिला. आज हा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. एका मोठ्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टीच्या आकाशातून चंद्र निखळला आहे अशीच काहीशी भावना सिनेरसिकांच्या मनात आहे.
खरेतर अभिनयाचे बाळकडू शशी कपूर यांना घरातूनच मिळाले होते. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राज आणि शम्मी कपूर यांच्यासोबत शशी कपूर यांनीही अभिनय क्षेत्रातच करियर करायचे ठरवले. बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांनी १९४० पासून मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या ‘आग’ आणि ‘आवारा’ या दोन सिनेमांमध्येही त्यांनी सुरूवातीला काम केले. शशी कपूर म्हटले की स्मित हास्य करत आपल्या सहज अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता लोकांच्या समोर यायचा. अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा वयाने मोठे असूनही शशी कपूर यांनी ‘दिवार’ सिनेमात त्यांच्या लहान भावाची भूमिका स्वीकारली. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अँग्री यंग मॅनला ‘मेरे पास माँ है’ असे शांत आणि संयतपणे सांगणारा त्याचा लहान भाऊ शशी कपूर यांनी ज्या ताकदीने साकारला त्याला जवाब नाही. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी फक्त दिवार सिनेमात नाही तर ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘नमकहलाल’, ‘सिलसिला’ ‘कभी कभी’ या सिनमांमध्येही बघायला मिळाली. सिनेमा अमिताभ यांच्याभोवती केंद्रीत असला तरीही शशी कपूर यांची भूमिका मात्र खास असायची. त्यांनाही बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत असत. इतकेच नाही तर नलिनी जयंत, माला सिन्हा, तनुजा, नंदा यांसारख्या अभिनेत्रींपासून त्यांनी अगदी रेखा, राखी, नीतू सिंग यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. ‘जब जब फूल खिलें’ या सिनेमातील त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यातील गाणी चांगलीच गाजली. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा देखील त्यांच्या अभिनया इतकाच हिट विषय आहे. ‘खिलते हैं गूल यहाँ’, ‘घुंगरूकी तरह बजताही रहाँ हूँ मै’, ‘परदेसीयोंसे ना अखिया मिलाना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही आणि अशी अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.
एकीकडे विविधरंगी आणि बहुढंगी व्यावसायिक सिनेमांमधून काम करत असताना समांतर सिनेमा आणि नाटक हा या प्रकारातही शशी कपूर यांनी राज्य केले. ‘कलयुग’ या सिनेमाचा उल्लेखही न करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्या सारखेच होईल. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात शशी कपूर, रेखा, राज बब्बर, अनंत नाग, अमरिश पुरी, व्हिक्टर बॅनर्जी, ए. के. हंगल, विजया मेहता, ओम पुरी, रिमा लागू, सलीम घोष, मदन जैन अशी कलाकारांची फौज होती. हा सिनेमा ‘महाभारत’ ही थीम घेऊन बनवण्यात आला होता. ज्याप्रमाणे कर्णाचा शेवट होतो तसाच काहीसा शेवट शशी कपूर यांचा या सिनेमात होतो. त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेचे नावही करण असेच होते. हा सिनेमा म्हणजे शशी कपूर यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. कारण या सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असूनही आपल्या अभिनयातले वेगळेपण त्यांनी जपले. बेजुबान, क्रोधी, बसेरा, विजेता, भवानी जंक्शन या सिनेमांमधूनही त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाची झलक सगळ्या सिनेरसिकांनी पाहिली.
‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘समाधी’, ‘वक्त’, ‘आमने सामने’ अशा १२५ पेक्षा जास्त व्यावसायिक सिनेमांमधून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द गाजवली आणि रसिकांच्या मनावर राज्य केले. पृथ्वी थिएटर या वडिलांच्या बंद पडलेल्या थिएटरची सुरूवातही त्यांनी नव्याने केली. अभिनयातून आनंद लुटणारा हा अभिनेता मात्र गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. ज्या अभिनेत्याने डान्सची वेगळी स्टाईल आणली त्या माणसाला त्याच्या आयुष्यातील अखेरची वर्षे मात्र व्हील चेअरवर काढावी लागली यापेक्षा मोठी शोकांतिका काय? आज मात्र काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. दीर्घ आजाराने हा कलाकार जरी आपल्यातून हरवला असला तरीही पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे त्यांच्या आठवणी कायम सगळ्यांनाच आनंद देत राहतील यात काहीही शंका नाही.
समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com