– संपदा जोगळेकर- कुळकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शाळेत जाणारी संपदा इयत्ता आठवीपर्यंत केवळ हजेरीपटावरतीच माहीत होती. कमालीची बुजरी, अबोल आणि घाबरट. इयत्ता नववीपासून काय झालं माहीत नाही, पंख फुटले आणि खो-खो, चित्रकला, नृत्य, वक्तृत्व अशा सर्व बाजूंनी बोलकी झाली, व्यक्त होऊ लागली. कॉलेजमध्ये त्यात भर पडली अभिनयाची.
रंगमंचाची ऊर्जा काही भन्नाटच चीज आहे. रंगमंच अनुभवणाऱ्यांना ती भिनते तर रसिकांना ती भावते. संधी मिळत गेली आणि नाटक, मालिका, जाहिरात मॉडेलिंग, चित्रपट, बॅले अशी मुशाफिरी सुरू झाली त्यात निवेदन, सूत्रसंचालन, लेखन, दिग्दर्शन होतच. गंमत म्हणजे या प्रत्येक भूमिकेत रसिकांनी, वाचकांनी, प्रेक्षकांनी चांगलं स्विकारलं.
मग काय यातला एकही धागा न सोडता पुढे जात राहिले. छान संसार सुरू झाला. आता २५ वर्ष झाली, मुलगी २३ वर्षाची झाली. करीअरला २८-२९ वर्ष झाली. मी आणि राहुलनी आपल्या चाळिशीनंतर वेगळं काही करण्याचं ठरवल होतं त्यासाठी कामाला लागलो वयाच्या पस्तिशीनंतर लगेचच. वेगळं म्हणजे नेमक काय? याचा शोध सुरू झाला आणि अखेरीस २००९ सालापासून फुणगूस, ता- संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी इथे ‘आनंदाचं शेत’( Farm Of Happiness) या नावानं कृषीपर्यटन करायचा निर्णय घेतला.
आंबा, काजू, तांदुळ, नाचणी, हळद, पावटा, कुळीथ, तीळ आणि ९-१० प्रकारच्या भाज्या असा गावातल्या १२ सहकाऱ्यांना हाताशी धरून कृषीसंसार सुरू झाला. या शेतीत पारंपरिक पध्दत, नवी पध्दत असे प्रयोग करत आमच्यापुरती शेती होऊ लागली. जोडीला कृषीपर्यटन होम स्टे सुरू केला. देशविदेशातून आलेल्या पर्यटकांना कोकणातल्या अन्नाचा सन्मान आणि अन्ननिर्मितीची जगभरातली आवश्यकता, त्याबद्दलची सजगता, जागृकता याची जाणिव करून देत आहोत. पर्यटकही पसंती दर्शवू लागले आहेत.
वाचा : संपदा जोगळेकर ‘लोकसत्ता डिजिटल अड्डावर’; तुम्हालाही मिळणार प्रश्न विचारण्याची संधी
‘ ट्रीप अडवायझर’ या पर्यटनसंबंधीच्या अग्रगण्य वेबसाइटकडून सलग ५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील ‘नंबर वन’ पर्यटन प्रकल्प म्हणून गौरवण्यात आलं. Outlook responsible tourism तर्फे २०१६ चा बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरीझम प्रॉपर्टी हे राष्ट्रपातळीवरील ॲवॉर्ड, IIPTI (International Institute for Peas Through Tourism of India ) यांच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते २०१५ चा उद्योजिका पुरस्कार, उद्योग अनुभव प्रतिष्ठान ठाणे या संस्थेचा २०१८ चा उद्योगभूषण पुरस्कार, नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर मॅगझिनमध्ये आमच्या प्रवासाची नोंद घेणारा विस्तृत लेख, वेगवेगळ्या मान्यताप्राप्त वर्तमानपत्र, मासिकं यांनी घेतलेली नोंद हे तर या प्रवासातलं सुखावणारं पण अनपेक्षित वळण लागलं आहे.
शेतीला १२ वर्ष, तर कृषीपर्यटनाला ६ वर्षे झाली. शहरातले बौध्दीक कष्ट आणि आता अंगमोडून मेहेनतही चांगलीच शिकवण देते आहे. माझ्या राहुलचे यात अपार श्रम आहेत. जे. जे. स्कूलचा कलाकार जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर जसा सिन्सिअरली काम करत होता, तसाच शेतकरी झाल्यावरही. पहिले ६ वर्ष मुंबईत सोमवार ते शुक्रवार नोकरी, शनिवार रविवार शेती…. घर बांधणं. मी ठाण्याच्या घरी सून, आई, आणि राहूलची आर्थिक सहकारी अशा जबाबदाऱ्या सांभळल्या आणि आता दोघही पूर्णपणे गावाला. निवडक प्रोजेक्टस चालू पण ९० टक्के कृषीपर्यटन. आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय आनंदी अनुभव देतोय. मिळून घेतलेल्या निर्णयामुळे आलेल्या कित्येक संकटात हसत सामोरे जातो आहोत. यश मिळालं की सगळे आणि समस्या आली कीही सगळे, हे आमचं नशीब आहे. १४ गुर, १२ सहकारी, मुलगी, सासुबाई, आम्ही दोघं आणि कृषीपर्यटन मोठं कुटुंब सांभाळते आहे. सेंद्रीय शेती, पेरणी, लावणी, कापणी, झोडणी, भाजीतोड, साठवणीचे पदार्थ, आदरातिथ्य शिकते आहे. उभारलेल्या भाताची प्रत्येक लोंब माझ्यासाठी सेलिब्रिटी असते आणि मी कॅमेरामन.
मातीचा एक रंग हाताला लागला की निसर्गाच्या कित्येक रंगांचा प्रकाशझोत अंगावर पडतो आहे. नाटकासारखंच इथलाही प्रतिसाद जिथल्यातिथे मिळतो. चुकलं तर पीकं नाराज होतात आणि बरोबर जमलं की रोपं आनंदानं पानांची टाळी वाजवत ‘स्टँडीग ओवेशन’ देतात…. अजून काय हव!?