‘एक व्हिलन’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील दबदब्यापुढे ‘बॉबी जासूस’ आणि ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटांना सपशेल हार मानावी लागली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांची आठवड्याच्या शेवटाची बॉक्सऑफिसवरील कामगिरी निराशाजनक राहिली. ‘एक व्हिलन’ चित्रपटासमोर बॉक्स ऑफिसवर ते टिकाव धरू शकले नाहीत. जिथे विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ने ७.५८ कोटींचा आकडा नोंदवला, तिथे अरमान जैनच्या ‘लेकर हम दिवाना दिल’ चित्रपटाने जेमतेम १.६ कोटींची मजल मारली. अरमान जैनला कपूर नावाचादेखील उपयोग झाला नाही. अरमान हा गतकाळचे अभिनेते राज कपूर यांचा नातू आहे. तर, दुसरीकडे ‘एक व्हिलन’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातदेखील चांगली कामगिरी करीत १६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाची एकूण मिळकत ९८.८८ कोटी इतकी झाली आहे.
या वर्षासाठी बॉलिवूडपटांचे बॉक्स ऑफिसवरील यशाचे आत्तापर्यंतचे रोकॉर्ड पडताळून पाहता, या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘जय हो’ हा बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत सर्वात पुढे होता. सलमान खानचा अभिनय असलेल्या या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील मिळकतीला अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ने मागे टाकत बॉक्स ऑफिसवरील नंबर एकची जागा हस्तगत केली. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने केलेल्या टि्वटनुसार ‘हॉलिडे’ने चार आठवड्यांत ११२.१८ कोटींचा गल्ला जमवला. तर, ‘जय हो’ ने जवळजवळ १११ कोटींचा धंदा केला होता. असे असले तरी, अलिकडेच प्रदर्शित झालेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरचा एक व्हिलनदेखील चांगली कामगिरी करीत असून, हा चित्रपट २०१४चा सर्वात जास्त कामाई करणारा चित्रपट ठरू शकतो.

Story img Loader