बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याचं आपण पाहिलं आहे. यामुळे आमिरचं प्रचंड नुकसा झालं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मही आमिरच्या या चित्रपटाला प्रदर्शित करायला तयार नाहीत. एकंदरच आमिरची काही जुनी वक्तव्यं आणि बॉयकॉट ट्रेंड यांचा चांगलाच फटका या चित्रपटाला बसला आहे. इतकंच नाही तर गुलशन कुमार यांच्यावर तयार होत असलेल्या ‘मोगुल’ नावाच्या चित्रपटातूनही आमिर बाहेर पडला आहे. पण आमिर आता लवकरच पुन्हा अभिनेत्री काजोलबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
१९९७ मध्ये ‘ईष्क’ नंतर २००६ मध्ये ‘फना’ या दोन चित्रपटानंतर आमिर आणि काजोल पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन काम सुरू आहे. आमिरच्या आधीच्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघून निर्माते चांगलेच चिंतेत आहेत. त्यामुळे या नवीन चित्रपटाची तारीखही आजून निश्चित केलेली नाही. या चित्रपटाचं नाव आहे ‘सलाम वेंकी’!
सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर करत हिंदी चित्रपटात पदार्पण करणारी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री रेवती या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘रात’, ‘अब तक छप्पन’ अशा वेगवेगळ्या चित्रपटात रेवती यांनी काम केलं आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्यावर बेतलेल्या ‘मेजर’ या चित्रपटाही रेवती यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. २००४ मध्ये ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटाच्या माध्यमातून रेवती यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. आता आमिर आणि काजोलचा हा ‘सलाम वेंकी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला दूसरा चित्रपट असणार आहे.
चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं असलं तरी या चित्रपटाची प्रदर्शनाची नेमकी तारीख अजून नक्की झाली नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. आमिर आणि काजोल बरोबरच या चित्रपटात अभिनेत्री आहाना कुमरा आणि अभिनेता विशाल जेठवा ही महत्वाचा भूमिकेत दिसणार आहेत.
आणखी वाचा : “न्यूड फोटोंचे परिणाम…”; रणवीर सिंगने फोटोशूट प्रकरणी जबाबात पोलिसांना काय सांगितलं?
असं म्हंटलं जातंय की या चित्रपटात आमिरपेक्षा सर्वात उत्तम काम विशाल जेठवा याने केलं आहे. त्याचं पात्र ही सर्वात जास्त उठावदार असल्याचं म्हंटलं जात आहे. विशाल जेठवाने याआधी ‘मर्दानी २’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. विशालच्या या भूमिकेची प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. विशाल येणाऱ्या काळात सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.