बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटांच्या निवडीमुळे आणि विषयांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. आमिर खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता आमिर खानने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आमिर खानची ही मुलाखत घेतली. यावेळी आमिर खानने लाल सिंग चड्ढा या चित्रपटाशिवाय विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी आमिरने नागराज मंजुळेंचे तोंडभरुन कौतुक केले.
या मुलाखतीदरम्यान आमिर खानने नागराज मंजुळेंबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच त्याने मी तुमचा खूप मोठा चाहता आहे असेही नागराज मंजुळेंना सांगितले. यावेळी आमिर खान म्हणाला, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला याची कल्पनाही नाही. तुम्ही इतक्या वेळेपासून बोलत आहात, पण आता मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे.”
“अन् अचानक माझ्या लक्षात आलं…” आमिर खानने सांगितला आईचा ‘तो’ किस्सा
“मी तुमचा खरंच खूप मोठा चाहता आहे. तुम्ही इतके चांगले चांगले चित्रपट बनवता. आताच तुम्ही झुंड हा चित्रपटाची निर्मिती केली. तो चित्रपट इतका हिट ठरला नाही, जेवढा ठरायला हवा होता. त्यात जी कथा दाखवण्यात आली होती, ती फारच मस्त होती.” असेही आमिरने सांगितले.
“तुमच्या या कामात फारच खरेपणा आहे. तुम्हाला जी गोष्ट करायची असते ती तुम्ही फार आवडीने करता आणि त्याच जोराने ती करता हे आजकाल फार कमी पाहायला मिळते. अन्यथा कधी कधी कधी काय होते की तणावाखाली येऊन मार्केटला फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातो. यात आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी होतो. पण तुम्ही तुमच्या मनाचं आणि हृदयाचं ऐकता आणि मला तेच फार आवडते. म्हणून मी तुम्हाला अनेकदा सांगतो की एखादा रोल असेल तर मलाही सांगा. साईड रोल असेल तरी मला चालेल”, असे आमिर खान म्हणाला.
त्यावर नागराज मंजुळेंनी आमिर खानचे आभार मानले. “ही माझ्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक अभिनेता आणि माणूस म्हणून नक्कीच ओळखतो. पण आता तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट म्हणालात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद”, असे नागराज मंजुळे म्हणाले.
दरम्यान आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे.
हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.