बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो कायमच त्याचे चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. त्याचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतात. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. अक्षय कुमार हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने अक्षय कुमारने नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
मनसेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन अक्षय कुमार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय कुमार आणि राज ठाकरे हे उभे राहून हात मिळवताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावरही या भेटीचा आनंद पाहायला मिळत आहे. अभिनेते अक्षय कुमार ह्यांनी आज ४ नोव्हेंबर २०२२ रोजी राजसाहेबांची सदिच्छा भेट घेतली, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.
आणखी वाचा : “मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने नुकतंच राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हजेरी लावली. या भेटीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने त्याची आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नेमकी कशी असेल, त्यासाठी अजून काय मेहनत घ्यावी लागेल, याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी त्याने राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “हा लूक अजून फायनल झालेला नाही…” छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमारचे जाहीर वक्तव्य
महेश मांजरेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा मुंबईत पार पडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची घोषणा खुद्द राज ठाकरेंकडून करण्यात आली. त्यावेळी त्याचा फर्स्ट लूकची झलकही दाखवण्यात आली.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमारला भूमिका कशी मिळाली? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने “मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी”, असं मला राज ठाकरे म्हणाले, असे त्याने सांगितले. “छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन. महेश मांजरेकर आणि मी पहिल्यांदा काम करणार आहे. हा एक चांगला अनुभव असेल, याची मला खात्री आहे”, असेही तो यावेळी म्हणाला होता.