गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘इफ्फी २०१७’चीच चर्चा कलाविश्वात पाहायला मिळतेय. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत आणि बऱ्याच वादांच्या भोवऱ्यात पार पडलेल्या या सोहळ्यात अखेरच्या काही क्षणांमध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार यांनीही हजेरी लावली होती. यंदाच्या इफ्फीत महानायक अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४८ व्या इफ्फी मध्ये स्मृती इराणी आणि अक्षय कुमारने अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी पुरस्कार देण्यासाठी बिग बींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. तेव्हा अक्षय त्यांना घेण्यासाठी व्यासपीठावरुन खाली आला आणि त्याने बिग बींचे पाय धरले. अक्षयने त्यांच्या पाया पडताच बिग बींनी त्याला आपुलकीने मिठी मारली. तेव्हा उपस्थितांमध्येही अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य खुलल्याचे पाहायला मिळाले. अक्षय कुमार बिग बींच्या पाया पडतानाचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. अनेक नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारची प्रशंसा करत त्याला दाद दिली. पण, त्यानंतर बिग बींनी मात्र एक अनपेक्षित ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले. एका ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट करत बिग बींनी लिहिले, ‘अक्षय जे केलंस ते योग्य नाही, मी त्यावेळी संकोचलो होतो.’

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने…

बच्चन यांच्या या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी अक्षयची प्रशंसाच केली, असे म्हणायला हरकत नाही. कारण पुरस्कार प्रदान करण्यासाठी अक्षय कुमारला बोलावले असतानाही बिग बींचा अनुभव आणि त्यांना असणारा मान या सर्व गोष्टी लक्षात घेतच अक्षयने त्यांचे पाय धरले. त्याचा हाच अंदाज बच्चन यांचे मन जिंकून गेला होता. त्यांनी आणखी एक ट्विट करत अक्षय कुमार, करण जोहर आणि इफ्फीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे सस्नेह आभार मानले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor akshay kumar publicly embarrasses big b amitabh bachchan in iffi