हिंदी चित्रपटसृष्टीत एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनेक कलाकारांच्या नावाला पसंती दिली जाते. यातच एक नाव सर्वांच्याच आवडीचं आहे आणि ते म्हणजे अभिनेता अनिल कपूरचं. आपल्या अभिनय कौशल्याच्या आणि जिद्दीच्या बळावनर अनिलने या कलाविश्वात भक्कम स्थान मिळवलं आहे. त्याच्या या प्रवासात अनेक मंडळींचा हातभारही लागला. पण, या साऱ्यांमध्ये तो सर्वाधिक महत्त्वं देतो ते म्हणजे पत्नी सुनिताला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळात पत्नीच्याच एका सवयीमुळे आपल्याला काम करण्यासाठीची प्रेरणा मिळते असंही त्याने स्पष्ट केलं आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरुन यावेळी अनिलने सुनितासोबतच्या सुरेख नात्याला उलगडा केला आहे. प्रेमकहाणीला सुरुवात झाल्यापासुन ते कौटुंबिक जीवनात आलेल्या यशापयशापर्यंत सुनिताने कशा प्रकारे आपली निस्वार्थ मनाने साथ दिली हेच त्याने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

एका मित्राने सुनिताला अनिलचा फोन नंबर दिला होता. प्रँक कॉल करण्यासाठी म्हणून तिने तो नंबर लावला, अनिलने फोन उचलला आणि तिचा आवाज ऐकताच तो तिच्या प्रेमात पडला. सुरुवातीला वरवर बोलणारे अनिल- सुनिता कालांतराने एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. कित्येकदा तर सुनिताला भेटायला जाण्यासाठी अनिलच्या खिशात पैसेही नसायचे. अशा वेळीही तिने त्याला मदत केली असल्याचं त्याने या पोस्टमध्ये न चुकता नमूद केलं आहे.

सुनिता ही एका बँक कर्मचाऱ्याची मुलगी होती, तर अनिल कलाविश्वात आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होता. पण, आपली ओळख तयार केल्याशिवाय आणि काही अंशी यशस्वी झाल्याशिवाय तिला लग्नाचं मागणं घालावं तरी कसं, हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार घर करायचा. अखेर नशिबाने त्याची साथ दिली, आणि लगेचच सुनिताला लग्नाची मागणी घालत साधारण अवघ्या दहाजणांच्या उपस्थितीत त्यांनी सहजीवनाची शपथ घेतली. मुख्य म्हणजे लग्नानंतर तिसऱ्या दिवशी अनिल पुन्हा त्याच्या कामात व्यग्र झाला होता. तर सुनिता एकटीच, त्याच्याशिवाय थेट हनिमूनला गेली होती.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

जवळपास ४५ वर्षांपासून अनिल आणि सुनिता एकत्र आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. किंबहुना आपण रोज सकाळी उठून कामासाठी निघतो यामागेही सुनिताच कारण असल्याचंही अनिल म्हणाला. तिला आदल्या दिवशी दिलेल्या पैशांचं काय केलं, असं विचारलं असता ते पैसे तर संपले असं तिचं उत्तर असतं. आता पत्नीचं हे उत्तर आल्यानंतर पतीने घरात थांबून कसं बुवा चालेल?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor anil kapoor reveals how he fell in love with wife sunita kapoor