हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या काळात कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचे किस्से फारच वेगळे होते. हल्लीच्या दिवसांत आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी काढणं सहज शक्य झालंय. पण, जुन्या काळात आपल्या आवडत्या अभिनेत्याची साधी सहीसुद्धा अनेकांसाठी फार महत्त्वाची होती. त्याच काळचा एक किस्सा आरजे अनमोलने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला. ‘अनमोल की अनमोल कहानिया’मध्ये यावेळी देव आनंद आणि त्यांच्या अनोख्या चाहतीचा किस्सा शेअर करण्यात आला. चित्रपट कलाकारांविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळणाऱ्या वतावरणात त्यावेळी प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारा अभिनेता देव आनंद यांच्या ‘नवकेतन फिल्म्स’च्या ऑफिसचा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक एका मासिकात छापण्यात आला होता. मासिकात हा नंबर छापला जाणं म्हणजे चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीसोबत संपर्क साधण्याची एक संधीच होती.
नंबर छापला गेल्यापासूनच देव आनंद यांच्या ऑफिसमध्ये चाहत्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली. देव साहेब जेव्हा ऑफिसमध्ये असत तेव्हा फोन उचलून चाहत्यांशी संवाद साधत. हे सर्व सुरु असतानाच एक अभिनेत्री त्यांची फार मोठी चाहती होती. तिने एक चाहतीच म्हणून देव यांना फोन केला. त्यावेळी या अभिनेत्रीने दोन- तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे तिने नाव बदलून फोन करण्याचा निर्णय घेतला. रिटा या नावाने तिने घाबरत ‘नवकेतन’च्या ऑफिसमध्ये फोन केला आणि तो देव आनंद यांनीच उचलला.
फोनवरुन आपल्या आवडत्या कलाकाराशी संवाद साधताना त्या अभिनेत्रीच्या आवाजातून आनंद व्यक्त होत होता. त्यानंतर तिचं फोन करणं सुरुच होतं. एक दिवस देव आनंद यांनी फोनवर बोलतानाच रिटाला ‘जॉनी मेरा नाम’च्या सेटवर भेटण्यासाठी बोलावलं. हे ऐकून रिटा फार खूश झाली. पण, ती कधीच देव आनंद यांना भेटायला गेली नाही. किंबहुना त्यानंतर तिने त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करणंही बंद केलं. आता तुम्ही म्हणाल ही रिटा म्हणजे नेमकी कोणती अभिनेत्री होती?
(व्हिडिओ सौजन्य- आरजे अनमोल / फेसबुक)
देव आनंद यांना नाव बदलून फोन करणारी ती अभिनेत्री होती रेखा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये रेखा यांनी आपलं स्थान निर्माण केलं. आता रेखा यांचं हे अनोखं ‘फॅनहूड’ देव आनंद यांच्यापर्यंत कधी पोहोचलं की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण, नशीबाची खेळी म्हणा किंवा आवडत्या कलाकारापोटी असणारं प्रेम म्हणा… रेखा यांच्या आयुष्यात अशी एक संधी आली ज्यावेळी रिटा म्हणजेच रेखा यांच्या हस्ते हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘गाईड’ला म्हणजेच अभिनेता देव आनंद यांना जीवनगौरव या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.